युक्रेनमधील मोहिमेची जबाबदारी जनरल व्हॅलेरी गेरासिमोव्ह यांच्याकडे

रशियाच्या संरक्षण मंत्रालयाची घोषणा

मॉस्को – रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने युक्रेनमधील लष्करी मोहिमेची जबाबदारी संरक्षणदलप्रमुख जनरल व्हॅलेरी गेरासिमोव्ह यांच्याकडे सोपविली आहे. दिवसेंदिवस युक्रेनमधील लष्करी मोहिमेची व्याप्ती अधिकच वाढत असल्याने ‘ऑपरेशनल कमांड’मध्ये सुधारणा आवश्यक आहेत. याची जाणीव ठेऊन नवी नियुक्ती करण्यात येत असल्याचे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनमधील मोहिमेसाठी जनरल सर्जेई सुरोव्हिकिन यांची नियुक्ती केली होती. मात्र अवघ्या तीन महिन्यानंतर त्यांची बदली करण्यात आली असून यापुढे ते जनरल गेरासिमोव्ह यांचे ‘डेप्युटी’ म्हणून कार्यरत राहणार आहेत.

Valerie Gerasimovऑक्टोबर महिन्यात रशियाच्या ‘एरोस्पेस फोर्सेस’चे प्रमुख असणाऱ्या जनरल सर्जेई सुरोव्हिकिन यांची युक्रेनच्या लष्करी मोहिमेची प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. यासाठी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी पुढाकार घेतल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. चेचेन व सिरियातील मोहिमांचा अनुभव असलेल्या जनरल सुरोव्हिकिन यांना रशियन लष्करात ‘जनरल आर्मागेडन’ म्हणून ओळखण्यात येते.

फेब्रुवारी महिन्यात सुरू झालेल्या युक्रेन मोहिमेदरम्यान त्यांनी दक्षिण युक्रेन तसेच लुहान्स्क प्रांतातील कारवायांचे नेतृत्त्व केले होते. त्यापूर्वी त्यांनी सिरियातील रशियन लष्करी मोहिमेतही महत्त्वाची भूमिका बजावली होती. अलेप्पो शहर ताब्यात घेण्यासाठी त्यांनी केलेल्या कामगिरीमुळे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी त्यांना ‘हिरो ऑफ रशिया’ हा सन्मान दिला होता. ऑक्टोबर महिन्यापासून रशियाने सुरू केलेल्या प्रखर क्षेपणास्त्र व ड्रोनहल्ल्यांसाठी जनरल सुरोव्हिकिन यांनी पुढाकार घेतला होता.

गेल्या काही दिवसात रशियन राजवटीकडून युक्र्रेनमधील संघर्ष हा युक्रेन सरकार अथवा फौजांविरोधात नाही तर नाटोविरोधात सुरू असलेली लढाई असल्याचे वारंवार सांगण्यात येत आहे. त्याचवेळी नजिकच्या काळात रशिया आपल्या हल्ल्यांची व्याप्ती अधिक वाढवेल व त्यात ‘टॅक्टिकल न्यूक्लिअर वेपन्स’चा समावेश असू शकतो, असे इशारेही देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर संरक्षणदलांचे प्रमुख म्हणून कार्यरत असणाऱ्या जनरल गेरासिमोव्ह यांची युक्रेन मोहिमेचे कमांडर म्हणून नियुक्ती करणे लक्ष वेधून घेणारे ठरते.

रशिया पुढील काही दिवसात युक्रेनमधील मोहिमेची फेररचना करील, असे दावे रशियन विश्लेषक व माध्यमे करीत आहेत. जनरल गेरासिमोव्ह यांची नियुक्ती त्याचाच भाग असून संरक्षणदलांमधील समन्वय व त्यांचा सहभाग अधिक वाढविण्यासाठी ही नियुक्ती उपयुक्त ठरेल, असे म्हटले जाते. मात्र युक्रेन तसेच पाश्चिमात्य माध्यमांनी गेरासिमोव्ह यांची नियुक्ती पुतिन यांची मोहीम अपयशी ठरल्याचे संकेत देणारी आहे, अशी टीका केली आहे.

हिंदी

leave a reply