…तर दक्षिण कोरिया अण्वस्त्रांची निर्मिती करील

- दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इशारा

सेऊल – ‘उत्तर कोरियाच्या अण्वस्त्रांचा तिढा धोकादायक ठरू लागला तर, दक्षिण कोरिया अण्वस्त्रांची तैनाती करील किंवा स्वत:हून अण्वस्त्रांची निर्मिती करील’, असा इशारा दक्षिण कोरियन राष्ट्राध्यक्ष युन सूक-येओल यांनी दिला. उत्तर कोरियाकडून अण्वस्त्रांच्या हल्ल्याच्या धमक्या वाढू लागल्यानंतर दक्षिण कोरियाने ही आक्रमकता स्वीकारल्याचा दावा केला जातो. गेल्याच आठवड्यात दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकेबरोबर अण्वस्त्रांच्या तैनातीबाबत चर्चा सुरू असल्याची घोषणा केली होती.

Korean-president-Yoonगेल्या महिन्यात उत्तर कोरियाने अमेरिका, जपान व दक्षिण कोरियाला अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिली होती. तसेच अमेरिका व दक्षिण कोरियातील युद्धसराव म्हणजे आपल्यावरील हल्ल्याची पूर्वतयारी असल्याचा आरोप उत्तर कोरियाने केला होता. यापुढेही युद्धसराव सुरू राहणार असतील तर ते उत्तर कोरियाच्या सुरक्षेसाठी धोकादायक समजले जातील आणि त्याविरोधात आपल्या पद्धतीने कारवाई केली जाईल, अशी धमकी उत्तर कोरियान दिली होती.

अमेरिका व दक्षिण कोरियातील युद्धसरावांचे कारण देऊन उत्तर कोरियाने गेल्या वर्षभरात 80 हून अधिक क्षेपणास्त्र चाचण्या घेतल्याचा दावा केला जातो. त्याचबरोबर दोन वेळा जाहीरपणे अमेरिका, दक्षिण कोरिया व जपानवर हल्ल्याच्या धमक्या दिल्या आहेत. तर उत्तर कोरियाने पहिल्यांदाच आपले आण्विक धोरण बदलून ‘फर्स्ट स्ट्राईक पॉलिसी’चा अवलंब केला जाईल, असे जाहीर केले होते. उत्तर कोरियाच्या या धमक्यांचा हवाला देऊन दक्षिण कोरियन राष्ट्राध्यक्ष येओल यांनी अण्वस्त्रांच्या निर्मितीबाबत लक्ष वेधून घेणारी घोषणा केली.

उत्तर कोरियाने अण्वस्त्र हल्ल्यांच्या धमक्या बंद केल्या नाही तर दक्षिण कोरियाला देखील अण्वस्त्रांनी सज्ज होण्यासाठी विलंब लागणार नसल्याचा दावा राष्ट्राध्यक्ष येओल यांनी केला. दक्षिण कोरियाकडे असलेले प्रगत विज्ञान व तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपला देश अतिशय वेगाने अण्वस्त्रसज्ज होईल, असे राष्ट्राध्यक्ष येओल यांनी कॅबिनेट बैठकीत स्पष्ट केले. त्यामुळे दक्षिण कोरिया अण्वस्त्रांबाबत अधिकच गंभीर असल्याचे दिसत आहे.

हिंदी English

leave a reply