जर्मनीने रशिया-युक्रेन शांतीचर्चेसाठी प्रयत्न करावेत

- सत्ताधारी पक्षातील सदस्यांची मागणी

बर्लिन/मॉस्को/किव्ह – जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ शोल्झ यांनी रशिया-युक्रेन शांतीचर्चेसाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी देशातील सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी केली आहे. सत्ताधारी आघाडीचा भाग असलेल्या ‘सोशल डेमोक्रॅटिक पार्टी’च्या २००हून अधिक सदस्यांनी चॅन्सेलर शोल्झ यांना पत्र लिहिले असून फ्रान्ससह इतर देशांचे सहकार्य घेऊन युक्रेनमधील संघर्षबंदीसाठी कृती करावी, अशी भूमिका सदस्यांनी मांडली आहे. याच पार्श्वभूमीवर जर्मनीच्या संरक्षणमंत्र्यांनी युक्रेनला अतिरिक्त रणगाडे पुरविणे शक्य नसल्याचे जाहीर केले आहे.

जर्मनीने रशिया-युक्रेन शांतीचर्चेसाठी प्रयत्न करावेत - सत्ताधारी पक्षातील सदस्यांची मागणीरशिया-युक्रेन युद्धाला एक वर्ष उलटून गेल्यानंतरही युद्धाचा निकाल नक्की काय असेल याबाबत अजूनही अनिश्चितता आहे. पाश्चिमात्य देशांनी अब्जावधी डॉलर्सची शस्त्रे पुरविल्यानंतरही रशियाला माघार घेण्यासाठी भाग पाडणे, युक्रेनला शक्य झालेले नाही. त्यामुळे अमेरिकेसह युरोपिय देशांमध्ये युक्रेनविरोधातील नाराजीची भावना वाढत असून अनेक देशांमध्ये युक्रेनला असलेले समर्थन कमी होत असल्याचे संकेत मिळाले आहेत.

याच पार्श्वभूमीवर जर्मनीतील सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी चॅन्सेलर शोल्झ यांच्याकडे संघर्षबंदीसाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी करणे लक्ष वेधून घेणारे ठरते. जर्मनीने गेल्या काही दिवसांमध्ये युक्रेनला करण्यात येणाऱ्या शस्त्रसहाय्यात वाढ केली होती. युक्रेनने मागणी केलेले प्रगत लिओपार्ड रणगाडेही जर्मनीकडून युक्रेनला पुरविण्यात आले होते. त्याचवेळी इतर शस्त्रसहाय्यही देण्याचे संकेत देण्यात आले होते. जर्मन सरकार युक्रेनला शस्त्रसहाय्य देण्यासाठी धडपडत असताना सरकारचा भाग असलेले पक्ष व त्यातील सदस्य मात्र त्यावर नाराज असल्याचे दिसत आहे.

जर्मनीबरोबरच अमेरिकेतूनही युक्रेनला देण्यात येणाऱ्या मदतीबाबत असलेली भूमिका बदलत असल्याचे संकेत मिळत आहेत. अमेरिकेतील प्रमुख विश्लेषक निकोलाय पेट्रो यांनी, युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी शस्त्रे मागण्याऐवजी रशियाबरोबर चर्चा करण्यासाठी हालचाली कराव्यात असे बजावले आहे.

leave a reply