दक्षिण कोरिया अमेरिकेकडून अतिप्रगत चिनूक खरेदी करणार

सेऊल – उत्तर कोरियाकडून वाढत असलेल्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर दक्षिण कोरियाने अतिप्रगत शस्त्रास्त्रांच्या खरेदीचा सपाटा लावला आहे. दक्षिण कोरियाच्या सरकारने अमेरिकेकडून अतिप्रगत चिनूक हेलिकॉप्टर्सच्या खरेदीचा प्रस्ताव मंजूर केला. यामुळे दक्षिण कोरियाच्या लष्करी सामर्थ्यात वाढ होणार असल्याचा दावा केला जातो. अमेरिका, ब्रिटननंतर जगभरात सर्वाधिक चिनूक हेलिकॉप्टर्सनी सज्ज असणाऱ्या देशांमध्ये दक्षिण कोरियाचा समावेश आहे.

दक्षिण कोरिया अमेरिकेकडून अतिप्रगत चिनूक खरेदी करणारदक्षिण कोरियन संरक्षणदलांच्या ताफ्यात बोईंग कंपनीची सुमारे 38 ‘सीएच-47डी’ चिनूक हेलिकॉप्टर्स आहेत. लष्करी कारवाई तसेच मालवाहू आणि बचावकार्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या हेलिकॉप्टर्सचा वापर 38 वर्षांपर्यंत करता येतो. अशा या चिनूक हेलिकॉप्टर्सच्या जुन्या आवृत्तीचे अद्ययावतीकरण करण्याचे संकेत दक्षिण कोरियाने दिले होते. यासाठी काही वर्षांपूर्वी दक्षिण कोरिया व अमेरिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चाही झाली होती.

पण गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेच्या बोईंग कंपनीने या चिनूक हेलिकॉप्टर्सची नवी आवृत्ती तयार केली होती. ‘सीएच-47एफ’ चिनूक हेलिकॉप्टर्स आधीच्या आवृत्तीपेक्षा अधिक अवजड मालवाहू आणि अतिप्रगत तंत्रज्ञानाने सज्ज आहे. अमेरिकेबरोबर ब्रिटन, भारत, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, इटली, सिंगापूर आणि नेदरलँड्स हे देश या नव्या प्रगत आवृत्तीच्या हेलिकॉप्टर्सचा वापर करीत आहेत. त्यामुळे दक्षिण कोरियाने जुन्या चिनूक हेलिकॉप्टर्सचे अद्ययावतीकरण करण्यापेक्षा नव्या आवृत्तीच्या हेलिकॉप्टर्सच्या खरेदीची तयारी केली आहे. यासाठी दक्षिण कोरियाने 1.15 अब्ज डॉलर्सची तरतूद केली आहे.

दक्षिण कोरिया अमेरिकेकडून किती ‘सीएच-47एफ’ चिनूक हेलिकॉप्टर्स खरेदी करणार, याचे तपशील जाहीर केलेले नाहीत. पण दक्षिण कोरिया आपल्या हवाईदलासाठी 20 चिनूक हेलिकॉप्टर्सची खरेदी करू शकतो, असा दावा केला जातो. तर अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात दक्षिण कोरियासाठी 18 चिनूकच्या विक्रीला मंजूरी दिली होती. सदर चिनूक हेलिकॉप्टर्स 2028 सालापर्यंत दक्षिण कोरियाच्या ताफ्यात जमा होतील, असा दावा केला जातो. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी दक्षिण कोरियाने अमेरिकेकडून एफ-35 या अतिप्रगत स्टेल्थ लढाऊ विमानांची खरेदी केली होती. तसेच दक्षिण कोरियाने अमेरिकेला नव्याने लष्करी तळही उपलब्ध करून दिला आहे. तर अमेरिकेबरोबरच्या लष्करी सरावावरुन उत्तर कोरियाने दक्षिण कोरियाला धमकावले होते.

leave a reply