जागतिक अर्थव्यवस्थेला यावर्षी मंदीचा फटका बसण्याची शक्यता

‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या अहवालातील इशारा

Global economyडॅव्होस – जागतिक अर्थव्यवस्थेला 2023 मध्ये मंदीचा फटका बसण्याची शक्यता असल्याचा इशारा जगातील आघाडीच्या अर्थतज्ज्ञांनी दिला. डॅव्होसमध्ये सुरू असलेल्या ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’मध्येे प्रसिद्ध झालेल्या ‘चीफ इकॉनॉमिस्टस्‌‍ आऊटलुक’ या अहवालातून ही बाब समोर आली. ‘जागतिक अर्थव्यवस्था डळमळीत होत असतानाच जगातील प्रमुख अर्थतज्ज्ञांपैकी दोन तृतियांश अर्थतज्ज्ञांनी मंदीबाबत बजावले आहे’, या शब्दात ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या व्यवस्थापकीय संचालक सादिआ झहिदी यांनी अहवालातील निष्कर्षाची माहिती दिली. गेल्या काही दिवसात आंतरराष्ट्रीय नाणेनिधी व वर्ल्ड बँकेसारख्या प्रमुख अर्थसंस्थांनीही जागतिक मंदीच्या धोक्याकडे लक्ष वेधले होते.

Saadia_Zahidi2019 साली चीनमध्ये आलेल्या कोरोनाच्या साथीनंतर 2020 साली जगातील अनेक अर्थव्यवस्थांना मंदीला तोंड द्यावे लागले होते. त्यानंतर 2021 साली जागतिक अर्थव्यवस्था हळुहळू पूर्वपदावर येत असल्याचे संकेत मिळाले होते. मात्र गेल्या वर्षी सुरू झालेल्या रशिया-युक्रेन युद्धानंतर सर्व आर्थिक समीकरणे कोलमडल्याचे दिसत आहे. युद्धामुळे इंधनाचे दर कडाडले असून जागतिक पुरवठा साखळीही विस्कळीत झाली आहे. बहुतांश देशांमध्ये महागाईचा भडका उडाला असून सामान्य जनतेला ‘कॉस्ट ऑफ लिव्हिंग क्रायसिस’ला तोंड द्यावे लागत आहे. महागाई कमी करण्यासाठी जगातील सर्वच मध्यवर्ती बँकांनी व्याजदरात वाढ करण्याचे धोरण राबविले आहे. त्याचा फटका अर्थव्यवस्थेला बसत असून अनेक क्षेत्रातील मागणी घटल्याचे समोर आले आहे.

responsive_large_webया पार्श्वभूमीवर, अपवाद वगळता जगातील बहुतांश अर्थव्यवस्थांचे विकासदर घसरणीच्या दिशेने प्रवास करीत असल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच चीनने 2022 सालातील जीडीपीची आकडेवारी जाहीर केली होती. चीनचा विकासदर 1976 सालानंतरच्या नीचांकी पातळीवर पोहोचल्याचे त्यातून उघड झाले होते. अमेरिका व ब्रिटनसारख्या देशांचा विकासदरही घटला असून युरोपिय महासंघाच्या अर्थव्यवस्थेतही पडझड दिसून येत आहे. ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या अहवालातून याला दुजोरा मिळाल्याचे दिसते. ‘जानेवारी 2023 चीफ इकॉनॉमिस्टस्‌‍ आऊलुक’ या अहवालासाठी ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ने जगभरातील 20हून अधिक प्रमुख अर्थतज्ज्ञांशी संपर्क साधला होता. त्यातील दोन तृतियांश अर्थतज्ज्ञांनी यावर्षी जागतिक अर्थव्यवस्थेला मंदीचा फटका बसेल, असे बजावले आहे. तर एक तृतियांश अर्थतज्ज्ञांनी मंदीची शक्यता नाकारली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर मंदीचा भडका मोठ्या प्रमाणात उडणार असल्याकडे काही अर्थतज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे. महागाईची सर्वाधिक झळ युरोप खंडाला बसेल, असा दावाही करण्यात आला.

‘महागाईचा भडका, घटणारा विकासदर, कर्जाचा वाढता बोजा आणि तीव्र मतभेद असलेली स्थिती यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर आवश्यक असलेल्या गुंतवणुकीचे प्रमाण घसरते आहे. विकास व असुरक्षित घटकांची जीवनशैली सुधारण्यासाठी गुंतवणूक ही आवश्यक बाब ठरते’, या शब्दात ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या व्यवस्थापकीय संचालक सादिआ झहिदी यांनी अहवालावर भूमिका स्पष्ट केली. काही दिवसांपूर्वीच जागतिक अर्थव्यवस्थेच्या एक तृतियांश भागाला यावर्षी आर्थिक मंदीचा फटका बसेल, असा इशारा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख क्रिस्तालिना जॉर्जिव्हा यांनी दिला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे वर्ष जागतिक अर्थव्यवस्थेसाठी अधिक खडतर ठरेल, असेही नाणेनिधीच्या प्रमुखांनी बजावले होते.

leave a reply