पेरूमध्ये सरकारविरोधी आंदोलनात 45 जणांचा बळी

निदर्शकांकडून राजधानी लिमा ताब्यात घेण्याचा प्रयत्न

PERU-POLITICS-PROTESTलिमा – गेल्या महिन्यापासून पेरूमधील सरकारविरोधात सुरू असलेले आंदोलन तीव्र झाले आहे. या आंदोलनात किमान 45 जणांचा बळी गेल्याचा दावा केला जातो. तर गुरुवारी निदर्शकांकडून राजधानी लिमा ताब्यात घेण्याचाही प्रयत्न झाला. राष्ट्राध्यक्षा डिना बोऊआर्ते यांनी राजीनामा द्यावा, अशी आग्रही मागणी निदर्शकांकडून सुरू आहे. ब्राझिल, मेक्सिको, इक्वेडोरनंतर राजकीय अस्थैर्याची झळ पोहोचलेला पेरू हा चौथा लॅटीन अमेरिकी देश ठरतो.

डाव्या विचारसरणीचे आणि पेरूचे माजी राष्ट्राध्यक्ष पेड्रो कॅसिलो यांना गेल्या महिन्यात सत्तेतून बाहेर काढण्यात आले. बेकायदेशीरित्या संसद बरखास्त करून सत्तेचा ताबा घेण्याचा प्रयत्न राष्ट्राध्यक्ष कॅसिलो यांनी केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. त्यानंतर 7 डिसेंबर रोजी डिना बोऊआर्ते यांनी सत्तेची सूत्रे हाती घेतली होती. तेव्हापासून पेरूच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये राष्ट्राध्यक्ष डिना यांच्याविरोधात जोरदार निदर्शने सुरू आहेत.

peru protest-1या निदर्शकांना आवरण्यासाठी पेरूच्या सुरक्षा यंत्रणांनी केलेल्या कारवाईत 45 जणांचा बळी गेला. गुरुवारच्या निदर्शनात देखील एक जण ठार झाल्याची माहिती समोर येत आहे. यावेळी किमान साडेतीन हजार निदर्शकांनी राजधानी लिमामध्ये घुसखोरी करून येथील सरकारी इमारती, व्यापारी केंद्रे ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, असा आरोप होत आहे. यावेळी निदर्शकांनी एका इमारतीला आग लावल्याचा ठपका पेरूच्या सुरक्षा यंत्रणांनी ठेवला आहे.

दरम्यान, गेल्या काही आठवड्यांपासून लॅटीन अमेरिकी देशांमध्ये राजकीय अस्थैर्य निर्माण झाले आहे. ब्राझिल, पेरू या देशांमध्ये सत्ताबदल हिंसाचाराला आमंत्रण देणारा ठरला आहे. तर मेक्सिको, इक्वेडोर या देशांमध्ये अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळ्या आणि सरकारमध्ये संघर्ष भडकला आहे. याचा परिणाम शेजारी लॅटीन अमेरिकी देशांच्या सुरक्षेवर होत असल्याचा दावा केला जातो.

leave a reply