चीनमधील निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर जागतिक शेअरबाजारात घसरण

कच्च्या तेलाचे दरही खाली आले

stocks downलंडन/बीजिंग – चीनमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाची वाढती व्याप्ती व ‘झीरो कोविड पॉलिसी’मुळे अर्थव्यवस्थेला बसणारे धक्के या पार्श्वभूमीवर सोमवारी जगभरातील शेअरबाजारांमध्ये जोरदार घसरण झाली. युरोपात ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी तर आशियात जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर व भारताचे शेअर निर्देशांक खाली आले. त्याचवेळी कच्च्या तेलाच्या दरांमध्येही तीन टक्क्यांची घसरण होऊन ते प्रति बॅरल ८० डॉलर्सनजिक पोहोचले. अमेरिकी डॉलर तसेच चीनच्या युआन चलनाच्या मूल्यातही घसरण दिसून आली. चीनमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या सातत्याने वाढत असून त्याप्रमाणात निर्बंधही अधिकाधिक कडक होत आहेत. त्यामुळे चीनच्या जनतेतील असंतोष तीव्र झाला असून गेल्या आठवड्यापासून सातत्याने निदर्शने सुरू आहेत. जगातील दुसऱ्या क्रमाकांच्या अर्थव्यवस्थेत सुरू असणाऱ्या या उलथापालथींचे पडसाद आंतरराष्ट्रीय स्तरावरही उमटू लागले आहेत. उत्पादन, आंतरराष्ट्रीय व्यापार व जागतिक पुरवठा साखळी या तिन्ही क्षेत्रात चीनचे स्थान आघाडीचे आहे. मात्र कोरोना निर्बंधांमुळे या सर्वांनाच मोठे धक्के बसले असून गुंतवणुकदार अस्वस्थ झाले आहेत.

याचे पडसाद सोमवारी आंतरराष्ट्रीय शेअरबाजारांमध्ये उमटले. अमेरिका, युरोप व आशियातील प्र्रमुख शेअर निर्देशांकांमध्ये ०.५ ते एक टक्क्यांपर्यंत घसरण झाली. काही शेअर निर्देशांक वर्षातील नीचांकी पातळीवर पोहोचल्याचेही समोर आले आहे. शेअरबाजारांपाठोपाठ कच्च्या तेलाच्या बाजारपेठेतही मोठी घसरण झाली. सोमवारी कच्च्या तेलाचे दर तीन टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल ८१ डॉलर्सपर्यंत खाली आले. अमेरिकी डॉलर तसेच चीनच्या युआन चलनाचे मूल्यही खाली आले असून पुढील काही दिवस शेअरबाजारात उमटणारे पडसाद कायम राहतील, असे संकेत विश्लेषकांनी दिले आहेत.

leave a reply