तुर्कीला आपली सुरक्षा करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही

तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन

erdogan turkey syria attackअंकारा/अलेप्पो – ‘सीमेअंतर्गत तसेच बाह्य धोक्यांपासून स्वसंरक्षण करणे, हा तुर्कीचा अधिकार आहे आणि हा अधिकार बजावण्यापासून तुर्कीला कोणीही रोखू शकत नाही’, असा इशारा तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यीप एर्दोगन यांनी दिला. त्याचबरोबर लवकरच सिरियात तुर्कीची नवी लष्करी कारवाई सुरू होणार असल्याची घोषणा एर्दोगन यांनी केली. दरम्यान, तुर्कीने सिरियाच्या उत्तरेकडील भागात केलेल्या हवाई हल्ल्यांविरोधात स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात निदर्शने सुरू केली आहेत.

सिरियातील कुर्द गटांनी ‘आयएस’ या दहशतवादी संघटनेविरोधातील कारवाई थांबविली आहे. तुर्कीने सिरियातील कुर्दांच्या ठिकाणांवर चढविलेले हवाई हल्ले आणि याविरोधात बायडेन प्रशासनाची मूग गिळून गप्प बसण्याची भूमिका, यांचा निषेध करून कुर्द गटांनी हा निर्णय जाहीर केला. रशियाने सिरियातील कुर्दांवर सुरू असलेल्या या हल्ल्यांवर चिंता व्यक्त करून तुर्कीला लष्करी कारवाई रोखण्याचे आवाहन केले.

syria protest turkeyपण तुर्की सिरिया तसेच इराकमधील कुर्दांच्या ठिकाणांवर सुरू असलेल्या कारवाईवर ठाम आहे. तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी सिरियातील हल्ल्यांवरुन आपल्यावर होत असलेले आरोप धुडकावले. तुर्कीच्या सुरक्षेसाठी ही कारवाई सुरू असून यातून माघार घेणार नसल्याचे एर्दोगन यांनी ठणकावले. तसेच सिरियाच्या सीमेजवळ तुर्कीचे लष्कर दाखल झाले असून लवकरच लष्करी मोहीम छेडण्यात येईल, असे एर्दोगन यांनी स्पष्ट केले.

तर गेल्या काही दिवसांपासून इराकच्या उत्तरेकडील भागात तुर्कीच्या लष्कराने छेडलेल्या ‘ऑपरेशन क्लॉ-लॉक’ या मोहिमेत ४८० दहशतवाद्यांना ठार केल्याचा दावा एर्दोगन यांनी केला. सिरियातील हल्ल्यांमध्येही शंभरहून अधिक दहशतवादी ठार झाल्याचे तुर्कीचे म्हणणे आहे. गेल्या चोवीस तासात सिरियाच्या अलेप्पो शहरात केलेल्या कारवाईत वापीजीचे १५ दहशतवादी मारल्याची माहिती दिली. दरम्यान, तुर्कीने सिरियातील कुर्दांच्या भागात चढविलेल्या हल्ल्यांच्या विरोधात रविवारी हजारो कुर्दांनी सिरियाच्या हसाका प्रांतातील कामिश्ली भागात निदर्शने केली. यावेळी कुर्द जनतेने तुर्कीच्या लष्कराविरोधात लढा देणाऱ्या आपल्या संघटनांना समर्थन जाहीर केले. तसेच तुर्कीच्या हल्ल्यांमुळे आम्ही आमचा भूभाग सोडणार नसल्याचा निर्धार कुर्दवंशियांनी व्यक्त केला आहे.

leave a reply