ग्रीसने इस्रायलकडून ‘स्पाईक’ क्षेपणास्त्रांची खरेदी केली

israel greeceजेरूसलेम – इस्रायल आणि ग्रीसमध्ये ४० कोटी डॉलर्सचा संरक्षणविषयक करार संपन्न झाला. यानुसार ग्रीस इस्रायलकडून रणगाडाभेदी ‘स्पाईक’ क्षेपणास्त्रांची खरेदी करणार आहे. या सहकार्यामुळे क्षेत्रीय स्थैर्यासाठी इस्रायल बांधिल असल्याचे अधोरेखित होते, असे इस्रायलचे संरक्षणमंत्री गॅलंट यांनी सांगितले. गेल्याच आठवड्यात इस्रायलने फिनलँडला देखील डेव्हिड्स स्लिंग ही हवाई सुरक्षा यंत्रणा पुरविणार असल्याचे घोषणा केली होती. नाटोतील फिनलँडच्या सहभागानंतर इस्रायलबरोबरच्या कराराची माहिती उघड करण्यात आली होती.

गेल्या काही वर्षांपासून इस्रायलने ग्रीस, सायप्रस या देशांबरोबरील संबंध व्यापक करण्यास सुरुवात केली आहे. भूमध्य समुद्रातील इंधनवायूच्या उत्पादनाबरोबरच संरक्षणविषयक सहकार्यावरही हे तीनही देश भर देत आहेत. याच पार्श्वभूमीवर इस्रायल आणि ग्रीसने ४० कोटी डॉलर्सचा करार पार पडला. इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, ‘रफायल’ कंपनी ग्रीसला रणगाडाभेदी स्पाईक क्षेपणास्त्रे पुरविणार आहे.

spike familyइस्रायलची रफायल ही कंपनी ‘स्पाईक’ या अतिप्रगत आणि लेझर गायडेड क्षेपणास्त्रांसाठी प्रसिद्ध आहे. जगभरातील लष्कर, हवाईदल आणि नौदलाकडून वापरल्या जाणाऱ्या या क्षेपणास्त्रांना ४५ वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरुन प्रक्षेपित करता येऊ शकते. लेझर गायडेड असल्यामुळे ही क्षेपणास्त्रे शत्रूच्या ठिकाणावर अचूक हल्ला चढविण्यासाठी ओळखली जातात. इस्रायलच्या कंपनीने आत्तापर्यंत वेगवेगळ्या श्रेणीतील ३४ हजार स्पाईक क्षेपणास्त्रांची विक्री केली असून यापैकी सहा हजार क्षेपणास्त्रांचा संघर्षासाठी वापर झाल्याचा दावा केला जातो.

जगभरातील ४० देश या क्षेपणास्त्रांचा वापर करीत असून यामध्ये नाटो व युरोपिय महासंघातील १९ सदस्य देशांचा समावेश आहे. इस्रायलच्या कंपनीने पाचव्या पिढीतील स्पाईक क्षेपणास्त्रांची निर्मती केली असून लवकरच अतिप्रगत सहाव्या पिढीतील स्पाईक क्षेपणास्त्रे आंतरराष्ट्रीय बाजारात विक्रीसाठी खुली केली जातील, अशी घोषणा रफायल कंपनीने केली होती.

leave a reply