युक्रेनसाठी पाठविण्यात येणारी शस्त्रे दहशतवादी व गुन्हेगारी टोळ्यांच्या हाती

संयुक्त राष्ट्रसंघटनेतील रशियन राजदूतांचा आरोप

terrorists and criminal gangsमॉस्को/किव्ह – अमेरिका व युरोपिय देशांकडून युक्रेनसाठी पाठविण्यात येणारी शस्त्रास्त्रे दहशतवादी गट व गुन्हेगारी टोळ्यांच्या हाती पडत असल्याचा आरोप रशियाच्या संयुक्त राष्ट्रसंघटनेतील राजदूतांनी केला. सोमवारी झालेल्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत राजदूत वॅसिली नेबेन्झिआ यांनी, युक्रेनमधील शस्त्रपुरवठ्याबाबत पाश्चिमात्य देशांचे वर्तन त्यांचा अप्रामाणिकपणा दाखवून देणारे आहे, असा ठपकाही ठेवला. एकीकडे युक्रेनला होणाऱ्या शस्त्रपुरवठ्यावरून रशिया आरोप करीत असतानाच, युक्रेनच्या ‘एअर डिफेन्स सिस्टिम्स’साठी वापरण्यात येणाऱ्या क्षेपणास्त्रांचा साठा मे महिन्यात संपण्याची शक्यता आहे, असा दावा अमेरिकेतील आघाडीच्या दैनिकाने केला आहे.

ukraine buk missile systemरशिया-युक्रेन युद्धाला सुरुवात झाल्यानंतर अमेरिका व युरोपिय देशांनी युक्रेनला शस्त्रपुरवठा करण्यासाठी पुढाकार घेतला होता. आतापर्यंत नाटोचे सदस्य देश असलेल्या अमेरिका व युरोपिय देशांकडून युक्रेनला ७० अब्ज डॉलर्सहून अधिक शस्त्रसहाय्य पुरविण्यात आले आहे. नाटोचे प्रमुख जेन्स स्टॉल्टनबर्ग यांनीच ही माहिती उघड केली होती. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात शस्त्रपुरवठ्याचे दावे झाले असले तरी प्रत्यक्षात युक्रेनी फौजांना त्या प्रमाणात शस्त्रसाठा उपलब्ध झालेला नाही. उलट गेल्या काही दिवसात युक्रेनी लष्करातील शस्त्रास्त्र टंचाई व कमतरतेच्या बातम्या पाश्चिमात्य माध्यमांकडून दाखविण्यात येत आहेत.

या पार्श्वभूमीवर, रशियाच्या राजदूतांनी केलेले आरोप लक्ष वेधून घेणारे ठरतात. सुरक्षा परिषदेतील आपल्या भाषणात राजदूत वॅसिली नेबेन्झिआ यांनी, आफ्रिकी देश तसेच युरोपातील सुरक्षायंत्रणांनी दिलेल्या माहितीचा उल्लेख केला. आफ्रिकेतील दहशतवादी गटांकडे युक्रेनसाठी पुरविण्यात आलेली शस्त्रे आढळल्याचे आफ्रिकी नेत्यांनी लक्षात आणून दिले होते, याकडेही नेबेन्झिआ यांनी लक्ष वेधले. युक्रेनला दिलेला शस्त्रसाठा आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘ब्लॅक मार्केट’मध्ये उपलब्ध होत असल्याचा दावाही रशियन दूतांनी केला.

UKRAINE-CRISIS-RUSSIA-PRISONERSरशियन दूत युक्रेनमधील शस्त्रपुरवठ्यावरून आरोप करीत असतानाच, अमेरिकेतील ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ या आघाडीच्या दैनिकाने, युक्रेनी लष्करातील क्षेपणास्त्रांच्या टंचाईचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. युक्रेनकडून प्रामुख्याने ‘बक’ व ‘एस-३००’ या हवाईसुरक्षा यंत्रणांचा वापर करण्यात येतो. या दोन्ही यंत्रणांसाठी युक्रेन दर महिन्याला सुमारे २७० क्षेपणास्त्रांचा वापर करतो. या क्षेपणास्त्रांचा साठा संपत आला असून मे महिन्याच्या अखेरपर्यंत युक्रेनकडे हवाईसुरक्षा यंत्रणांसाठी क्षेपणास्त्रे शिल्लक राहिलेली नसतील, असे अमेरिकी दैनिकाने म्हटले आहे.

अमेरिका व जर्मनीकडून युक्रेनला हवाईसुरक्षा यंत्रणा पुरविण्यात आल्या आहेत. मात्र त्यासाठी लागणाऱ्या क्षेपणास्त्रांचे उत्पादन मर्यादित असल्याकडे ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने लक्ष वेधले. पुढील काळात अमेरिका व युरोपकडून प्रगत यंत्रणा तसेच क्षेपणास्त्रे मिळणार असली तरी त्यासाठी लागणारा वेळ मोठा असल्याचा दावाही अमेरिकी दैनिकाने केला.

दरम्यान, रशिया व युक्रेनदरम्यान लष्करी जवानांचे ‘प्रिझनर स्वॅप’ पार पडल्याची माहिती माध्यमांनी दिली आहे. रशियाचे १०६ तर युक्रेनचे १०० जवान सोडण्यात आल्याचे सांगण्यात येते.

leave a reply