भूमध्य क्षेत्रातील तणावावरून ग्रीस, इजिप्त व सायप्रसचा तुर्कीला इशारा

भूमध्यअथेन्स – भूमध्य सागरी क्षेत्रातील तणावावरून ग्रीस, इजिप्त व सायप्रसने तुर्कीला नवा इशारा दिला आहे. संयुक्त राष्ट्रसंघटनेचा ठराव व आंतरराष्ट्रीय कायद्यांपलिकडे जाऊन तुर्कीने सायप्रसच्या प्रकरणात हस्तक्षेप करु नये, असे तिन्ही देशांनी बजावले आहे. तुर्कीने ‘नॉर्दर्न सायप्रस’मधील वादग्रस्त भाग पुन्हा खुले करण्याचा निर्णय घेतला असून काही महिन्यांपूर्वी तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन यांनी सदर भागाला भेटही दिली होती. तुर्कीच्या या कारवायांवर आंतरराष्ट्रीय स्तरावरून तीव्र प्रतिक्रिया उमटली असून ग्रीस, इजिप्त व सायप्रसची बैठकही त्याचाच भाग आहे. यापूर्वी ग्रीस व सायप्रसने जॉर्डनसोबत बैठक घेऊन तुर्कीविरोधात नवी आघाडी उघडण्याचे संकेत दिले होते.

गेल्या काही वर्षात करण्यात आलेल्या विविध सर्वेक्षणांमधून भूमध्य सागरी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात इंधनाचे साठे असल्याचे समोर आले आहे. त्यातील अधिकाधिक साठ्यांवर ताबा मिळविण्यासाठी तुर्कीने गेल्या वर्षापासून आक्रमक हालचाली सुरू केल्या आहेत. भूमध्य सागरात ग्रीस व सायप्रसच्या हद्दीतील इंधनसाठ्यांवर तुर्कीने आपला हक्क सांगण्यास सुरुवात केली आहे. ऑगस्ट महिन्यात व त्यानंतर तुर्कीने ‘रिसर्च शिप’ तसेच युद्धनौका पाठवून भूमध्य सागरात एकापाठोपाठ मोहिमा राबविण्यास सुरुवात केली होती. तुर्कीच्या या कारवायांवर आक्षेप घेऊन ग्रीसने भूमध्य सागरातील आपली संरक्षण तैनाती वाढविली होती.

त्याचवेळी दुसर्‍या बाजूला तुर्कीच्या कारवायांविरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर आघाडी उभी करण्यासाठीही ग्रीसने वेगाने पावले उचलली आहेत. गेल्या वर्षभरात ग्रीस सरकारने फ्रान्स, संयुक्त अरब अमिराती, इस्रायल, इजिप्त यासारख्या देशांबरोबर सामरिक सहकार्य मजबूत करण्यावरही भर दिला आहे. इजिप्तबरोबर आयोजित केलेली त्रिपक्षीय बैठक यातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. अथेन्समध्ये आयोजित करण्यात आलेली बैठक या प्रयत्नांना यश मिळत असल्याचे संकेत देणारी ठरते.

तीन देशांमध्ये पार पडलेली ही नववी बैठक असल्याची माहिती संबंधित देशांकडून देण्यात आली. या बैठकीत इजिप्तमधील एनर्जी नेटवर्क ग्रीस तसेच सायप्रसला जोडण्याच्या कराराला अंतिम मान्यता देण्यात आली. या माध्यमातून इजिप्तमधील इंधन युरोपला पुरविण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जाते.

१९७४ साली तुर्कीने सायप्रसवर आक्रमण करून काही भाग ताब्यात घेतला होता. या मोहिमेची आठवण म्हणून तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन यांनी, जुलै महिन्यात ‘सायप्रस’मधील तुर्कीश भागाला भेट दिली होती. या भेटीत सायप्रसमधील वादग्रस्त भाग असलेल्या ‘घोस्ट टाउन वरोशा’ पुन्हा सुरू करण्याचे संकेत दिले होते. तुर्की यंत्रणांनी त्यासाठी हालचालीही सुरू केल्याचे सांगण्यात येते. तुर्कीच्या या हालचालींमुळे अस्वस्थ झालेल्या ग्रीस व सायप्रसने आंतरराष्ट्रीय समुदायाच्या माध्यमातून तुर्कीवर दडपण आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

leave a reply