तुर्कीच्या आक्रमक वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर ग्रीसकडून क्रेटे बेटानजिकची हद्द वाढविण्याच्या हालचाली

क्रेटेअथेन्स/इस्तंबूल – तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन व इतर नेत्यांकडून सातत्याने देण्यात येणाऱ्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर ग्रीसने आपली हद्द अधिक वाढविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. भूमध्य समुद्रात असलेल्या क्रेटे बेटानजिकची हद्द १२ नॉटिकल मैलांपर्यंत वाढविण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात येत असल्याचे वृत्त ग्रीक माध्यमांनी दिले. एजिअन तसेच भूमध्य सागरी क्षेत्रातील बेटे व इंधनक्षेत्रांवरून ग्रीस आणि तुर्कीमध्ये जबरदस्त तणाव आहे. अशातच ग्रीसने हद्द वाढविण्याचा निर्णय घेतल्यास तुर्कीकडून त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.

क्रेटेतुर्की व ग्रीसमध्ये गेल्या काही वर्षांपासून ‘एजिअन’ सागरी क्षेत्रातील बेटे व इंधनक्षेत्राच्या अधिकारांवरून असलेला तणाव चांगलाच चिघळला आहे. तुर्कीने एजिअन सागरी क्षेत्रातील ग्रीसच्या हद्दीत इंधनक्षेत्राचे संशोधन तसेच उत्खननासाठी जहाजे पाठविली होती. त्यापाठोपाठ आपल्या संरक्षणसामर्थ्याचे प्रदर्शन करण्यासाठी विनाशिकाही पाठविल्या होत्या. तुर्कीच्या नजिक असलेल्या ग्रीक बेटांवरील लष्कर मागे घेऊन ग्रीसने त्यावरील हक्क सोडून द्यावा, अशी आक्रमक मागणी तुर्कीच्या राजवटीकडून करण्यात आली होती.

तुर्कीच्या या आक्रमकतेला प्र्रत्युत्तर देण्यासाठी ग्रीसनेही आपल्या संरक्षणसज्जतेत वाढ करण्यासाठी पावले उचलली होती. त्याचवेळी आखात, आफ्रिका तसेच युरोपातील देशांबरोबर संरक्षण सहकार्य मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे तुर्की अधिकच भडकला असून ग्रीसला उघडउघड धमक्या देण्यास सुरुवात केली आहे. याप्रकरणी युरोपिय महासंघ व नाटोकडून झालेली मध्यस्थी तात्पुरती राहिली असून तुर्कीच्या आक्रमकतेत अजूनही बदल झालेला नाही.

क्रेटेमात्र ग्रीसनेही तुर्कीच्या आक्रमकतेला प्रत्युत्तर देण्यासाठी वेगाने पावले उचलली आहेत. अमेरिकेसह युरोप तसेच आखाती देशांबरोबरील सहकार्य वाढविणे व संरक्षणसज्जतेसाठी वाढीव निधीची तरतूद या माध्यमातून ग्रीसने आपण तुर्कीला जशास तसे उत्तर देण्याची तयारी ठेवत असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. ग्रीसच्या या तयारीमुळे तुर्की अधिकच खवळला असून राष्ट्राध्यक्ष एर्दोगन व इतर नेते सातत्याने ग्रीसला धमकावित आहेत.

‘आम्ही एका रात्री अचानक येऊन दाखल होऊ, असे तुर्कीने यापूर्वी बजावले आहे. आशा आहे की तुर्कीचा हा संदेश ग्रीस व इतर देशांना नीट समजला असेल’, असा गंभीर इशारा तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन यांनी ऑक्टोबर महिन्यात दिला होता. त्यानंतर दोन आठवड्यांपूर्वी तुर्कीची क्षेपणास्त्रे ग्रीसची राजधानी अथेन्सवर मारा करु शकतात, अशी धमकी एर्दोगन यांनी दिली होती. त्यानंतर आता नाटोने ग्रीसच्या कारवायांकडे नीट लक्ष्य द्यावे नाहीतर तुर्कीला पावले उचलणे भाग पडेल, असे बजावण्यात आले आहे.

ग्रीसच्या नेत्यांनी तुर्की नेत्यांना चोख प्रत्युत्तर देतानाच राजनैतिक पातळीवरही हालचाली सुरू केल्या आहेत. सध्या ग्रीस-तुर्की संघर्षात बहुतांश देश ग्रीसचे समर्थन करीत आहेत. ही सकारात्मक बाब लक्षात घेऊन आपली बाजू अधिक भक्कम करण्यासाठी ग्रीसने क्रेटे बेटांनजिकची हद्द १२ नॉटिकल मैलांपर्यंत नेण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव मंजूर करून आंतरराष्ट्रीय यंत्रणांकडे सादर केला जाईल, अशी माहिती ग्रीसच्या माध्यमांनी दिली.

leave a reply