पाश्चिमात्यांच्या निर्बंधांना बगल देणारा रशिया व इराणमधील नवा व्यापारीमार्ग सुरू

व्यापारीमार्गमॉस्को – कॅस्पियन समुद्राद्वारे रशिया व इराणला जोडणारा ‘इंटरनॅशनल नॉर्थ-साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडोर-आयएनएसटीसी’ व्यापारीमार्ग सुरू झाला आहे. यामुळे रशिया व इराणमध्ये व्यापारी सहकार्य प्रचंड प्रमाणात वाढू शकेल. सदर व्यापारीमार्ग रशिया-इराणवरील पाश्चिमात्यांच्या निर्बंधांना बगल देणारा ठरतो, असा दावा ‘ब्लुमबर्ग’ या अमेरिकी वर्तमानपत्राने केला. या व्यापारी वाहतुकीच्या नव्या मार्गामुळे रशिया इराणसह थेट आशियाई देशांनाही जोडला जाईल, याची जाणीव या वर्तमानपत्राने करुन दिली आहे.

रशिया व इराणने नव्या पुरवठा साखळीद्वारे परस्पर सहकार्य वाढविण्याला महत्त्व दिले आहे. या पार्श्वभूमीवर, जून महिन्यात ‘आयएनएसटीसी’ या वाहतुकीच्या मार्गाचा वापर करून रशियाने इराणसाठी पहिले मालवाहू जहाज रवाना केले होते. रशियाच्या सेंट पीट्सबर्ग बंदरातून निघालेले जहाज ४० फूट उंचीचे दोन कंटेनर्स घेऊन कॅस्पियन समुद्रातील अस्ट्राखान बंदरात दाखल झाले होते. त्यानंतर सदर कंटेनर्स ट्रकवर लादून इराणमध्ये उतरविण्यात आले होते. यानंतर इराणच्या बंदर अब्बास बंदरात उभ्या असलेल्या जहाजावर हे कंटेनर्स भरून भारताच्या कांडला बंदरात दाखल झाले होते.

व्यापारीमार्गडॉन नदी, अझोव्ह सी, कॅस्पियन सी यातून प्रवास करणारी रशियाची मालवाहू जहाजे युरोप किंवा चीनला वळसा न घालता थेट आखाती व आशियाई देशांमध्ये पोहोचत आहेत. रशिया व इराणला जोडणाऱ्या ‘आयएनएसटीसी’ या मार्गाबाबत ‘ब्लुमबर्ग’ या अमेरिकन वर्तमानपत्राने इशारा दिला. युक्रेन युद्धामुळे युरोपिय देशांनी रशियन जहाजांना आपला सागरीमार्ग बंद केला आहे. अशा परिस्थितीत, पाश्चिमात्य देशांनी टाकलेल्या निर्बंधांचा परिणाम रशिया व इराणवर होणार नसल्याचा दावा या वर्तमानपत्राने केला.

काही महिन्यांपूर्वीच रशियाने इराणबरोबर अब्जावधी डॉलर्सचा दीर्घकालिन करार केला आहे. या नव्या व्यापारीमार्गामुळे सदर कराराला मोठे सहाय्य होणार असल्याची आठवण ब्लुमबर्गने करून दिली. २०२२ सालच्या पहिल्या दहा महिन्यांमध्ये रशिया-इराणमधील व्यापारात चार अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. तर गेल्या वर्षी उभय देशांमध्ये असलेली निर्यात १० टक्क्यांवरुन २७ टक्क्यांवर पोहोचल्याची आठवण या वर्तमानपत्राने करुन दिली.

leave a reply