युक्रेन सीमेनजिक रशियन लष्कराची वाढती तैनाती चिंताजनक

- विश्‍लेषकांचा दावा

रशियन लष्करमॉस्को/किव्ह – रशियाने युक्रेन सीमेत पुन्हा एकदा लष्करी तैनाती वाढविण्यास सुरुवात केली असून, हे नव्या संघर्षाचे संकेत असू शकतात अशी चिंता विश्‍लेषकांनी व्यक्त केली आहे. युक्रेनच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी रशियाने जवळपास ८० ते ९० हजार सैनिक सीमेनजिक तैनात केल्याची माहिती दिली. गेल्या सहा महिन्यात युक्रेन सीमेनजिक इतक्या मोठ्या प्रमाणात तैनाती करण्याची ही दुसरी वेळ ठरते. त्यामुळे रशियाच्या इराद्यांवर प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे. काही दिवसांपूर्वीच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी, युक्रेनमधील नाटोच्या वाढत्या हालचाली रशियासाठी ‘रेड लाईन’ असेल असा इशारा दिला होता.

अमेरिकेतील ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ या दैनिकाने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. यात सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेले व्हिडिओ तसेच सॅटेलाईट फोटोग्राफ्सचा उल्लेख करण्यात आला आहे. ‘सीएनए’ या अभ्यासगटाचे संचालक मायकल कॉफमन यांनी रशियन तैनातीसंदर्भात माहिती दिली आहे. कोणताही सराव किंवा ड्रिलच्या रशियन लष्करआयोजनाची माहिती देण्यात आली नसताना मोठ्या प्रमाणावर सैन्यतैनाती चिंतेचे कारण ठरते, याकडे कॉफमन यांनी लक्ष वेधले. सप्टेंबर महिन्यात बेलारुसबरोबरील लष्करी सरावानंतर ही तैनाती वाढली असल्याचा दावा काही विश्‍लेषकांनी केला आहे.

रशियन लष्कराचा भाग असलेले ‘४१ कम्बाईन्ड् आर्म्स आर्मी’ ही लष्करी तुकडी बेलारुसमधील सरावानंतर माघारी न जाता युक्रेन सीमेवर गेल्याचे दिसून आले आहे. त्याचवेळी राजधानी मॉस्कोनजिक तैनात असणारी ‘१ गार्डस् टँक आर्मी’ ही तुकडीही युक्रेनच्या दिशेने रवाना करण्यात रशियन लष्करआली आहे. युक्रेनच्या ‘नॅशनल सिक्युरिटी ऍण्ड डिफेन्स कौन्सिल’चे सचिव ओलेक्सि डॅनिलोव्ह यांनी, युक्रेन सीमेवर ८० ते ९० हजार रशियन लष्कर तैनात असल्याचा दावा केला आहे. ‘झॅपड २०२१’ सरावानंतर रशियाने आपली शस्त्रसामुग्री तसेच कंट्रोल ऍण्ड कम्युनिकेशन्स सेंटर्स युक्रेन सीमेनजिक ठेऊन दिल्याचेही त्यांनी सांगितले.

कॉफमन यांनी रशियन नेतृत्त्वाचे युक्रेनसंदर्भातील धोरण अधिक आक्रमक झाल्याची जाणीव करून दिली आहे. यापूर्वी युक्रेनचे नाटोतील सदस्यत्त्व रशियासाठी चिंताजनक ठरत होते, मात्र आता युक्रेनमधील नाटोच्या हालचालीदेखील ‘रेड लाईन’ असल्याचे रशियाकडून सांगण्यात येत असल्याचे ‘सीएनए’च्या संचालकांनी नमूद केले.

रशियन इंधनवाहिनीने जर्मनीतून इंधन खेचल्याचा दावा

मॉस्को – रशियातून युरोपिय देशांना इंधनपुरवठा करणार्‍या ‘यामल-युरोप’ इंधनवाहिनीने जर्मनीतून इंधनवायू उलट्या दिशेने खेचल्याचा दावा करण्यात आला आहे. रशिया युरोपिय देशांना कमी इंधन पुरवित असल्याचे आरोप होत असतानाच ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर काही काळ रशियातून युरोपिय देशांना होणारा इंधनपुरवठा थांबला होता. मात्र आता युरोपिय देशांना इंधनपुरवठा होत असल्याचे ‘गाझप्रोम’ या रशियन कंपनीकडून सांगण्यात आले. अमेरिकेतील ‘न्यूयॉर्क टाईम्स’ने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे.

leave a reply