उघूरवंशियांचा संहार घडविणार्‍या चीनने मानवी अवयवांच्या तस्करीतून अब्जावधी डॉलर्स मिळवले

- ऑस्ट्रेलियन वर्तमानपत्राचा थरकाप उडविणारा आरोप

उघूरवंशियांचा संहारबीजिंग – चीन झिंजियांग प्रांतातील उघूरवंशियांचा संहार घडवित असल्याचा आरोप अमेरिका तसेच आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना करीत आहेत. पण उघूरांच्या या वंशसंहारातून चीन अब्जावधी डॉलर्स कमावत असल्याचा थरकाप उडविणारा आरोप ऑस्ट्रेलियातील आघाडीच्या वर्तमानपत्राने केला. उघूरवंशियांच्या अवयवांची काळ्याबाजारात तस्करी करून चीन दरवर्षी अब्जावधी डॉलर्स कमाई करीत असल्याचे या वर्तमानपत्राने म्हटले आहे.

काही महिन्यांपूर्वी चीनने सुमारे १५ लाख उघूरवंशियांना तुरुंगात ठेवल्याचा आरोप झाला होता. कम्युनिस्ट राजवटीविरोधातील उघूरांचा आवाज दाबण्यासाठी चीनने हा तुरुंग उभारल्याचा दावा केला जातो. तसेच झिंजियांग प्रांतात शिल्लक असलेल्या उघूरवंशियांवरही चीनने कडक पाळत ठेवल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. हे उघूरवंशिय आपल्या घरापासून नेमक्या अंतरापर्यंतच प्रवास करू शकतात, असे कडक नियम त्यांच्यावर लादल्याचे प्रसिद्ध झाले होते. त्याचबरोबर चीन उघूरवंशियांच्या प्रार्थनास्थळांवरही कारवाई करीत असल्याची माहिती समोर येते.

चीनने आपल्यावरील हे आरोप फेटाळून उघूरांना शैक्षणिक केंद्रात ठेवल्याचे म्हटले होते. मात्र, शैक्षणिक केंद्राच्या नावाखाली चीन उघूरांना झिंजियांग प्रांतातून हद्दपार करीत असल्याचा ठपका पाश्‍चिमात्य देश व मानवाधिकार संघटनेने ठेवला होता. या छळछावणीचे फोटोग्राफ्स आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार संघटनेने देखील उघूरांबाबत चिंता व्यक्त केली होती.

उघूरवंशियांवरील चीनच्या अत्याचाराबाबत ऑस्ट्रेलियन वर्तमानपत्र ‘हेराल्ड सन’ने प्रसिद्ध केलेली माहिती खळबळ उडविणारी ठरली आहे. चीनने अटक केलेल्या उघूरवंशियांपैकी काहीजणच आपल्या घरी पोहोचतात. न केलेल्या गुन्ह्याची कबुली देण्यासाठी इतर उघूरवंशियांचा या तुरुंगात अनन्वित छळ केला जातो, असे प्रत्यक्षदर्शींनी म्हटले आहे. उघूरांप्रमाणेच इतर अल्पसंख्यांकांवरही चीन अशाच प्रकारे अत्याचार करीत असल्याचा आरोप ऑस्ट्रेलियन वर्तमानपत्राने केला आहे. ‘ऑस्ट्रेलियन स्ट्रॅटेजिक पॉलिसी इन्स्टिट्युट-एएसपीआय’ या अभ्यासगटाने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, चीन उघूरांबरोबर इतर अल्पसंख्याकांना देशभरातील वेगवेगळ्या फॅक्टरीज्मध्ये भरती करीत आहे.

एएसपीआयच्या आकडेवारीनुसार, २०१७ ते २०१९ या काळात कम्युनिस्ट राजवटीने झिंजियांगमधून सुमारे ८० हजार उघूरवंशियांची तस्करी केली. आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये कमी वेतन देऊन उघूरवंशिय व अल्पसंख्यांकांना कामगार म्हणून वापरले जाते. त्याचबरोबर उघूरवंशियांच्या अवयवांच्या तस्करीतूनही चीन प्रचंड प्रमाणात पैसा कमवित असल्याचा आरोप ऑस्ट्रेलियन वर्तमानपत्राने केला. चीन काळ्याबाजारात अवयवांची तस्करी करून दरवर्षी किमान एक अब्ज डॉलर्स मिळवित आहे.

यासाठी ऑस्ट्रेलियन वर्तमानपत्राने २०१९ सालच्या चायना ट्रिब्यूनचा दाखला दिला. चीनमध्ये दरवर्षी ६० हजार अवयवांचे प्रत्यार्पण केले जाते. त्याचबरोबर अवयव प्रत्यार्पण करणारी रुग्णालये, वैद्यकीय केंद्रे चिनी लष्कराच्या तुरुंगाजवळच आढळतात. याकडेही ऑस्ट्रेलियन वर्तमानपत्राने लक्ष वेधले. तर आंतरराष्ट्रीय बाजारात यकृत अथवा पित्ताशयाची किंमत एक लाख ६० हजार डॉलर्स इतकी असल्याची माहिती या वर्तमानपत्राने दिली.

सदर बातमीला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी प्रसिद्धी मिळाली असून काही वृत्तसंस्थांनी जून महिन्यातील संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार संघटनेच्या अहवालाची आठवण करून दिली. चीन उघूरांसह अल्पसंख्यांकांना लक्ष्य करून आंतरराष्ट्रीय काळ्याबाजारात अवयवांची तस्करी करीत असल्याचा आरोप मानवधिकार संघटनेने केला होता. ही भयंकर बाब असल्याचे मानवाधिकार संघटनेने म्हटले होते. मानवाधिकार आणि मानवी जीवन यांना चीनमध्ये फारशी किंमत दिली जात नाही, याची सार्‍या जगाला कल्पना आहे. पण चीन अल्पसंख्यांकांवर अत्याचार करून त्यांच्या हत्याकांडांचा मानवी अवयवांची तस्करी करीत असल्याची भयंकर बाब सार्‍या जगाला हादरविणारी ठरते. या बातमीचे भयंकर पडसाद जगभरात उमटू शकतात. चीनच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेला यामुळे जबर धक्का बसू शकतो.

कोरोनाची साथ चीनमध्येच उगम पावल्याचे आरोप होत असताना, चीनच्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्याची मागणी जगभरात होत आहे. अशा परिस्थितीत मानवी अवयवांच्या तस्करीबाबत होणार्‍या या आरोपांकडे चीनला डोळेझाक करता येणार नाही. हे आरोप खोटे असल्याचे चीनने सिद्ध केले नाही, तर त्याची फार मोठी किंमत आंतरराष्ट्रीय पातळीवरील रोषाच्या स्वरुपात चीनला चुकती करावी लागू शकते.

leave a reply