इराणच्या विरोधात आखाती देशांच्या एकजूटीची नितांत आवश्यकता आहे

- सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स

अल-उला – ‘आखाती देशांची सुरक्षा आणि स्थैर्याला हादरे देण्यासाठी इराण व इराणसंलग्न गटांनी सुरू केलेल्या दहशतवादी हालचाली व इराणच्या आण्विक आणि क्षेपणास्त्र कार्यक्रमापासून आखाती देशांना मोठा धोका संभवतो. या वाढत्या धोक्याविरोधात आखाती देशांनी संघटीत होण्याची हीच वेळ आहे. किंबहुना सध्या या एकजुटीची नितांत आवश्यकता आहे’, असे आवाहन सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी केले. सौदीच्या अल-उला येथे आयोजित केलेल्या ‘गल्फ कोऑपरेशन काऊन्सिल’च्या (जीसीसी) बैठकीत क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी हे आवाहन केले.

सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात (युएई), कतार, बाहरिन, ओमान आणि कुवैत या सहा देशांनी संघटीत केलेल्या ‘जीसीसी’ची महत्त्वाची बैठक नुकतीच पार पडली. साडेतीन वर्षानंतर पहिल्यांदाच कतारचे अमिर शेख तमिम या बैठकीत सहभागी झाले होते. या बैठकीच्या आधी सौदी अरेबियाने कतारबरोबर नव्याने सहकार्य प्रस्थापित करून साडेतीन वर्षांपासून सुरू असलेला कतारबरोबरील वाद संपविला. सौदी व कतारमधील या सहकार्याचे इतर अरब देशांसह जगभरातून स्वागत झाले. युएईने देखील या आठवड्यातच कतारबरोबर व्यापारी तसेच पर्यटन विषयक सहकार्य सुरू करणार असल्याचे जाहीर केले आहे.

या बैठकीच्या निमित्ताने सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी ‘जीसीसी’चे सदस्य असलेल्या सर्व आखाती देशांच्या एकजुटीची आवश्यकता असल्याचे सांगितले. ‘इराणच्या राजवटीचा आण्विक आणि क्षेपणास्त्र कार्यक्रम तसेच विध्वंसक घातपाती योजना, या क्षेत्राला विळखा घालत आहेत आणि त्यापासून आखाती देशांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे’, याची जाणीव सौदीच्या क्राऊन प्रिन्स मोहम्मद यांनी करून दिली. ‘आखाती तसेच जागतिक शांती आणि सुरक्षेसाठी धोकादायक बनलेल्या इराण आणि इराणसंलग्न दहशतवादी संघटनांच्या दहशतवादी कारवाया रोखायच्या असतील तर आखाती देशांना आंतरराष्ट्रीय समुदायासह एकत्र यावेच लागेल’, असे क्राऊन प्रिन्स म्हणाले.

कतारने देखील सौदी अरेबिया, युएई, कुवैत, बाहरिन तसेच इजिप्त या देशांनी नव्याने सहकार्य प्रस्थापित करण्यासाठी सुरू केलेल्या हालचालींचे स्वागत केले. कतार या सहकार्यामुळे गेल्या साडेतीन वर्षांपासून आखातात निर्माण झालेला तणाव संपुष्टात येईल, असा विश्‍वास कतारचे अमिर ‘शेख तमिम बिन हमाद अल-थानी’ यांनी व्यक्त केला. मात्र सौदीबरोबर सहकार्य प्रस्थापित करीत असताना, त्याचा कतार आणि इराणच्या संबंधांवर कुठलाही परिणाम होणार नसल्याचे शेख तमिम यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले.

इराणबरोबर कतार करीत असलेल्या सहकार्यामुळेच २०१७ साली सौदी आणि इतर अरब देशांनी कतारवर बहिष्कार टाकला होता. इराणच्या दहशतवादी कारवायांना कतारचे समर्थन असल्याचा आरोप सौदी व इतर अरब मित्रदेशांनी केला होता. कतारने हिजबुल्लाह या इराणसंलग्न दहशतवादी संघटनेला आर्थिक सहाय्य पुरविल्याचा ठपकाही सौदीने ठेवला होता.

दरम्यान, आखाती देशांमधील इराणच्या हालचालींविरोधात सौदी व इतर अरब देशांमध्ये एकजूट झालेली आहे. अशा परिस्थितीत कतार अजूनही इराणशी सहकार्य तोडण्यास तयार नसल्याचे दिसते. त्यामुळे साडे तीन वर्षानंतर सौदी आणि कतारमध्ये दिलजमाई झाली असली तरी इराणच्या प्रश्‍नावरुन दोन्ही शेजारी देशांमधले मतभेद कायम राहतील, असे आखाती वृत्तसंस्था सांगत आहे.

leave a reply