अमेरिकेच्या राजधानातील हिंसाचाराची प्रमुख देशांकडून गंभीर दखल

वॉशिंग्टन – अमेरिकेच्या राजधानीत झालेल्या निदर्शनांचे जगभरात पडसाद उमटले आहेत. जगभरातील प्रमुख देशांच्या नेत्यांनी यावर?खेद व्यक्त केला असून अमेरिकेत शांततेने सत्तेचे हस्तांतरण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली?आहे. त्याचवेळी चीनसारख्या हुकूमशाही राजवट असलेल्या देशाने हाँगकाँगमध्ये सुरू असलेल्या निदर्शनांचा संबंध अमेरिकेतील निदर्शनांशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र हाँगकाँगमधील निदर्शने लोकशाहीसाठी सुरू आहेत, याकडे लक्ष वेधून आंतरराष्ट्रीय माध्यमांनी चीनचा दावा हास्यास्पद ठरत असल्याचे शेरे मारले आहेत.

भारताच्या पंतप्रधानांनी अमेरिकेच्या राजधानीत झालेला हिंसाचार अस्वस्थ करणारा असल्याचे म्हटले आहे. ‘लोकशाहीची प्रक्रिया अशा बेकायदेशीर कारवायांनी वेठीस धरता येऊ शकत नाही. अमेरिकेत लवकरच शांतीपूर्ण मार्गने सत्तेचे हस्तांतर होईल’, अशी अपेक्षा भारताच्या पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे. ‘अमेरिकेत झालेला प्रकार अशोभनीय, खेदजनक आहे. लोकशाहीचा आधारस्तंभ अशी जगभरात ओळख असलेल्या अमेरिकेतील सत्तेचे हस्तांतरण पुढच्या काळात शांततेने पार पडणे अत्यंत महत्त्वाचे ठरते’, असे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी म्हटले आहे. तर ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री डॉमनिक राब यांनी वॉशिंग्टनमधील हिंसाचाराचे कुठल्याही प्रकारे समर्थन करता येणार नाही, असे बजावले आहे.

‘‘लोकशाहीवर प्रश्‍न उपस्थित करून हिंसाचार घडविणार्‍या काहीजणांच्या समोर आपल्याला मान तुकवता येणार नाही. आपला लोकशाहीवर विश्‍वास आहे. वॉशिंग्टनमध्ये जे काही घडले त्याला ‘अमेरिकन’ म्हणता येणार नाही’’, अशा नेमक्या शब्दात फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी आपली भूमिका मांडली. तर संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव अँटोनिओ गुतेरस यांनी अमेरिकेच्या राजधानीत झालेल्या हिंसाचारामुळे आपण व्यथित झालो आहोत, असे म्हटले आहे. जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांनी अमेरिकेतील घटनांमुळे आपण दुःखी असल्याचे सांगून यावर आपण संतापल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

जर्मनीचे परराष्ट्रमंत्री हैको मास यांनी अमेरिकेतील हिंसाचारावर बोलताना, यामुळे लोकशाहीचे शत्रू नक्कीच खूश झाले असतील, अशा मर्मभेदी शब्दात आपली भूमिका मांडली. या हिंसाचाराचा निषेध करून नाटोचे प्रमुख स्टोल्टनबर्ग यांनी अमेरिकेतील निवडणुकीच्या निकालाचा सर्वांनी आदर करावा, असे आवाहन केले आहे. दरम्यान, वॉशिंग्टन डीसीमधील हिंसाचाराबाबत चीनने अधिकृत पातळीवर दिलेली प्रतिक्रिया माध्यमांच्या चर्चेचा विषय बनली आहे.

अमेरिकेत झालेल्या निदर्शनांपेक्षाही हाँगकाँगमध्ये झालेली निदर्शने अधिक तीव्र होती. पण यात एकही जण ठार झालेला नाही, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी म्हटले आहे. याद्वारे हाँगकाँगमधील निदर्शकांवर चीनसमर्थक प्रशासनाकडून कठोर कारवाई केली जात नसल्याचा संकेत हुआ चुनयिंग यांच्याकडून दिला जात आहे. मात्र त्यांच्या या विधानांवर माध्यमांनी शेरे मारले आहेत. अमेरिकेतील निदर्शने व हाँगकाँगमध्ये लोकशाहीवादी अधिकारांसाठी सुरू असलेल्या निदर्शनांचा संबंध जोडता येऊ शकत नाहीत. हाँगकाँगमध्ये लोकशाहीवादी निदर्शने करीत आहेत, असे माध्यमांनी बजावले आहे.

leave a reply