इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयावर सायबर हल्ला केल्याचा हॅकर्सचा दावा

सायबर हल्लाजेरूसलेम – इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ आणि संरक्षण मंत्रालयावर सायबर हल्ला चढविल्याची घोषणा ‘मोझेस स्टाफ’ या हॅकर्सच्या गटाने केला. यामध्ये इस्रायली संरक्षण मंत्र्यांबरोबर लष्कराच्या जवानांची वैयक्तिक माहिती, फोटोज् आणि गोपनीय दस्तावेज आपल्या ताब्यात असल्याचा दावा या गटाने केला. हॅकर्सनी आपल्या संकेतस्थळ व टेलिग्रामच्या चॅनलवर ही माहिती अपलोड केली आहे.

‘गेली काही वर्षे इस्रायलच्या प्रत्येक हालचाली, प्रत्येक पावलांवर आमची करडी नजर आहे. तुम्ही घेतलेले सर्व निर्णय आणि विधानांवर आमची नजर आहे. अखेरीस इस्रायलने कल्पनाही केली नसेल, असा भीषण हल्ला आम्ही चढवू’, असा इशारा या हॅकर्सच्या गटाने दिला. इस्रायलच्या संरक्षण मंत्रालय व संबंधित विभागांचे सुमारे १६५ सर्व्हर्स आणि २५४ संकेतस्थळे हॅक केल्याचा दावा या गटाने केला. सुमारे ११ टेराबाईट इतका डाटा आपल्याकडे असल्याचे या हॅकर्सच्या गटाचे म्हणणे आहे. इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांचे नवे तसेच संरक्षणदलप्रमुखपदावर असतानाचे फोटोग्राफ्स या गटाने प्रसिद्ध केले. तसेच इस्रायलमधील इलेक्ट्रॉन सिलॅग आणि एप्सिलॉर या दोन कंपन्यांची माहितीही आपल्याकडे असल्याचे या हॅकर्सने म्हटले आहे.

इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाने हॅकर्सच्या या दाव्यांवर प्रतिक्रिया दिलेली नाही. पण इस्रायलच्या ‘नॅशनल सायबर डायरेक्टोरेट’ने दिलेल्या माहितीनुसार, मायक्रोसॉफ्टच्या सॉफ्टवेअरमधील त्रूटींमुळे हे शक्य झाले असून यात विशेष असे काही नसल्याचे म्हटले आहे. दरम्यान सदर हॅकर्सचा गट हा इराणी असून महिन्याभरापूर्वीच सदर गट कार्यान्वित झाल्याचा दावा केला जातो.

leave a reply