ऑस्ट्रेलिया व आसियन देशांमध्ये ‘कॉम्प्रिहेन्सिव्ह स्टॅ्रटेजिक पार्टनरशिप’

ऑस्ट्रेलिया व आसियनकॅनबेरा – ‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्रातील चीनच्या वाढत्या कारवायांच्या पार्श्‍वभूमीवर ऑस्ट्रेलिया व आसियन देशांमध्ये ‘कॉम्प्रिहेन्सिव्ह स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप’वर एकमत झाले आहे. या करारामुळे ऑस्ट्रेलियाचे आग्नेय आशियाई देशांबरोबरील राजनैतिक व सुरक्षाविषयक सहकार्य अधिक भक्कम होईल, असे सांगण्यात येते. नव्या कराराच्या पार्श्‍वभूमीवर ऑस्ट्रेलियाने आग्नेय आशियाई देशांमध्ये १५ कोटी डॉलर्सच्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे.

‘हा एक अत्यंत महत्त्वाचा करार असून इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील ऑस्ट्रेलिया व आसियनचे मध्यवर्ती स्थान बळकट करणारा ठरेल. करारामुळे ऑस्ट्रेलिया व आसियनमधील भागीदारीही भविष्यात अधिक मजबूत होईल. इंडो-पॅसिफिकमधील आसियनच्या भूमिकेची ऑस्ट्रेलियाला जाणीव असून हे क्षेत्र अधिक स्थित, समृद्ध व्हावे यासाठी आम्ही समर्थन देऊ’, या शब्दात ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी कराराचे महत्त्व स्पष्ट केले.

आग्नेय आशियाई देशांनीही याचे स्वागत केले असून, हा करार एक नवा टप्पा असून परस्परांसाठी लाभदायक ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. ‘आसियन’ सदस्य देशांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी, ‘ऑकस डील’च्या पार्श्‍वभूमीवर सदर करार लक्ष वेधून घेणारा असल्याचा दावा केला आहे. आसियनबरोबरील कराराची माहिती दिल्यानंतर ऑस्ट्रेलियाने आग्नेय आशियाई देशांमध्ये १५ कोटी डॉलर्सहून अधिक गुंतवणुकीची घोषणा केली आहे. आरोग्य, ऊर्जा, सुरक्षा व शिक्षण या क्षेत्रांमध्ये ही गुंतवणूक करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाने केलेल्या करारानंतर चीननेही त्याच स्वरुपाचा करार करण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.

leave a reply