पाकिस्तानला भारतापेक्षाही आनंदी ठरविणारा ‘हॅपिनेस इंडेक्स’ म्हणजे ‘माईंडगेम’

- परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचा टोला

बंगळुरू – संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘सस्टेनेबल डेव्हलमेंट सोल्युशन्स नेटवर्क’ने हॅपिनेस इंडेक्स अर्थात आनंदी देशांची यादी प्रसिद्ध केली. या यादीत भारत 126 व्या स्थानावर आहे. पण उपासमार, बेरोजगारी आणि अराजकाने ग्रासलेला पाकिस्तान या यादीत भारताच्या पुढे 108 व्या स्थानावर आहे. तर अर्थव्यवस्था डबघाईला आलेल्या श्रीलंकेला या यादीत 112 वे स्थान देण्यात आले आहे. तर लष्करी राजवटीच्या हुकूमशाहीखाली असलेला म्यानमार या यादीत 117व्या स्थानावर आहे. आनंदी देशाची अशारितीने करण्यात आलेल्या क्रमवारीवर भारतात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. तर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ही क्रमवारी म्हणजे ‘माईंडगेम’ असल्याचा टोला लगावला आहे.

पाकिस्तानला भारतापेक्षाही आनंदी ठरविणारा ‘हॅपिनेस इंडेक्स’ म्हणजे ‘माईंडगेम’ - परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचा टोलाबंगळुरूमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलताना परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी हॅपिनेस इंडेक्सवर जोरदार प्रहार केला. अशा स्वरुपाच्या याद्या तयार करताना काय विचारात घेतले जाते, ते कळायला मार्ग नसल्याचे सांगून याच्या विश्वासार्हतेवरच भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी प्रश्न उपस्थित केले. हा माईंडगेम असल्याचे सांगून यामागे भारतविरोधी मानसिकता व डावपेच असल्याचे स्पष्ट संकेत परराष्ट्रमंत्र्यांनी दिले. सोशल मीडियावर भारतीयांनी सदर हॅपिनेस इंडेक्सवर सडकून टीका करताना यामागे भारतविरोधी मानसिकता असल्याचा ठपका ठेवला होता.

पाकिस्तानात गव्हाचे पीठ मिळावे, यासाठी लागलेल्या लाईनमध्ये उभे राहणाऱ्यांचे बळी जात आहेत. पाकिस्तानच्या काही शहरांमध्ये अन्नासाठी हाणामारी होत आहे. पैसे मोजूनही अन्नधान्य मिळत नाही, अशी तक्रार इथली जनता करीत आहे. पाकिस्तान ‘बनाना रिपब्लिक’ अर्थात ज्या देशाची व्यवस्था पूर्णपणे कोसळली आहे, असा देश बनल्याचे या देशातील पत्रकारच सांगू लागले आहेत. या देशात केळी पाचशे रुपये डझन या दराने विकली जात असून यामुळे ‘बनाना रिपब्लिक’ची ही चर्चा नव्याने ऐरणीवर आली होती. अशा देशातील जनता भारतापेक्षाही अधिक आनंदात असल्याचे दावे ‘हॅपिनेस इंडेक्स’मध्ये ठोकण्यात आले आहेत, ही हास्यास्पद बाब ठरते, असे सांगून भारतीय सोशल मीडियावर आपल्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत.

परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी देखील यावर बोट ठेवून हा ‘माईंडगेम’ अर्थात प्रचारतंत्राचा भाग असल्याची मार्मिक प्रतिक्रिया देऊन भारतीयांच्या या प्रतिक्रियेवर शिक्कामोर्तब केले आहे. आनंद पहायचा असेल तर बंगळुरूला येऊन पहा, असा टोला जयशंकर यांनी सदर कार्यक्रमात लगावला. इतकेच नाही तर आपल्या सिंगापूरमधील मित्राने युरोपिय देशांपेक्षा भारतीय अधिक आनंदी असल्याचे म्हटले होते, याचा दाखलाही यावेळी परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी दिला.

याच कार्यक्रमात बोलताना जयशंकर यांनी ‘फर्गिव्ह अँड फर्गेट’ अर्थात माफ करा आणि विसरून जा, या भारताला वारंवार दिल्या जाणाऱ्या सल्ल्यावर आपली प्रतिक्रिया दिली. कशाला माफ करायचे आणि काय विसरून जायचे, ते आधी आपण स्पष्ट केले पाहिजे. आपल्या शहरावरचा दहशतवादी हल्ला झाला तर त्यासाठी माफी द्यायची आणि तो विसरून जायचा का, असा प्रश्न यावेळी जयशंकर यांनी केला. सारे काही माफ करून यापासून आपण धडा घेतला नाही, तर ती घातक बाब ठरेल, असे जयशंकर यांनी बजावले. थेट उल्लेख केला नसला तरी पाकिस्तानने भारतात घडविलेले घातपात व दहशतवादी हल्ल्याचा संदर्भ परराष्ट्रमंत्री जयशंकर देत असावेत, असे दिसत आहे.

गेल्या काही आठवड्यांपासून पाकिस्तानची जनता उपासमार सहन करीत असताना, भारताने औदार्य दाखवून आम्हाला सहाय्य करावे, अशी मागणी पाकिस्तानातील काहीजण करीत आहेत. अद्याप पाकिस्तानचे सरकार अधिकृत पातळीवर ही मागणी करीत नसले तरी भारताने स्वतःहून पुढाकार घेऊन आपल्या देशाला सहाय्य करावे, असे पाकिस्तानातील माध्यमे व पत्रकारांचे म्हणणे आहे. श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ या शेजारी देशांना भारत प्रचंड प्रमाणात सहाय्य करीत आहे, पण पाकिस्तानला सहाय्य नाकारून भारत दिलदारपणा दाखवायला तयार नाही, अशी टीका पाकिस्तानातून होत असताना, परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी पाकिस्तान अजूनही भारतविरोधी कारस्थाने सोडून द्यायला तयार नाही, याची आठवण करून दिली होती. याचा दाखला देऊन पाकिस्तानच्या समस्या सोडविण्यासाठी भारत सहाय्य करणार नाही, असे जयशंकर यांनी काही आठवड्यांपूर्वीच बजावले होते.

हिंदी

 

leave a reply