‘महत्त्वाकांक्षी’ चीनने एलएसीवर घुसखोरी केलीच तर परिस्थिती चिघळेल

- भारतीय लष्करप्रमुखांचा चीनला इशारा

पूणे – सौदी अरेबिया व इराण या देशांमध्ये समेट घडवून आणण्यासाठी चीनने केलेले प्रयत्न यशस्वी ठरले आहेत. त्याचवेळी रशिया व युक्रेनमध्ये 13 महिन्यांपासून सुरू असलेले युद्ध संपविण्यासाठी चीनने दोन्ही देशांना 12 कलमांचा समावेश असलेला शांतीप्रस्ताव दिला. आंतरराष्ट्रीय पातळीवर संपूर्ण सुरक्षा प्रदान करणारा देश म्हणून अमेरिकेची जागा घेण्यासाठी चीन उतावीळ झाला झाल्याचे यातून दिसत आहे. यासाठीच चीन या हालचाली करीत आहे, असे भारताचे लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी म्हटले आहे. अशी प्रचंड महत्त्वाकांक्षा असलेल्या चीनने भारताबरोबरील ‘एलएसी’वर पुन्हा घुसखोरीचा प्रयत्न केला, तर दोन्ही देशांमधील परिस्थिती चिघळेल. एलएसीवर कुठल्याही धोक्याचा सामना करण्याची पूर्ण सज्जता भारतीय लष्कराने ठेवलेली आहे, असे लष्करप्रमुखांनी बजावले.

‘महत्त्वाकांक्षी’ चीनने एलएसीवर घुसखोरी केलीच तर परिस्थिती चिघळेल - भारतीय लष्करप्रमुखांचा चीनला इशारा‘राईज ऑफ चायना अँड इट्स इम्पिकेशन्स फॉर द वर्ल्ड’ या विषयावरील परिसंवादात बोलताना जनरल पांडे यांनी आपले परखड विचार मांडले. 2016 सालापासून सौदी अरेबिया व इराणचे राजनैतिक संबंध संपुष्टात आले होते. दोन्ही देशांनी आपले दूतावास बंद करून एकमेकांच्या विरोधात टोकाची भूमिका स्वीकारली होती. पण चीनच्या मध्यस्थी करून सौदी अरेबिया व इराणची चर्चा घडवून आणली. ही चर्चा घडवून आणणारा चीन हा अमेरिकेपेक्षाही अधिक विश्वासार्ह देश असल्याचा दावा सौदीच्या माजी परराष्ट्रमंत्र्यांनी केला होता. तर चीन आखाती क्षेत्रात अमेरिकेची जागा घेत असल्याचे सांगून अमेरिकी मुत्सद्यांनी यावर गंभीर चिंता व्यक्त केली होती. राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या आखातविषयक आत्मघातकी धोरणांमुळेच चीनला तशी संधी मिळत असल्याचा आरोप अमेरिकेच्या मुत्सद्यांनी तसेच विरोधी पक्षनेत्यांनीही केला होता.

या पार्श्वभूमीवर भारताच्या लष्करप्रमुखांनी देखील चीनच्या आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढत असलेल्या प्रभावाची दखल घेतली आहे. सदर परिसंवादात बोलताना लष्करप्रमुखांनी चीनच्या महत्त्वाकांक्षेवर बोट ठेवले. प्रबळ आर्थिक शक्ती म्हणून उदयाला आल्यानंतर, चीनला आता आंतरराष्ट्रीय पातळीवरील अमेरिकेचे स्थान बळकावायचे आहे. यासाठी एका बाजूने चीनने शिकारी अर्थनीतिचा वापर सुरू केला आहे. तर दुसऱ्या बाजूला आपल्या दहा कोटीहून अधिक जनसंख्येला गरीबीतून बाहेर काढल्याचा दावा चीन करीत आहे. हा आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला दबदबा वाढविण्यासाठी सुरू असलेल्या चीनच्या प्रयत्नांचा भाग ठरतो. याबरोबरच बुद्धिसंपदेची चोरी, परदेशी कंपन्यांकडून व्यापारीदृष्ट्या महत्त्वाच्या माहितीची चोरी, या चीनच्या कारवाया चिंताजनक पातळीवर पोहोचलेल्या आहेत, याचीही जाणीव लष्करप्रमुखांनी नेमक्या शब्दात करून दिली.

आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी चीन कुठल्याही थराला जाऊ शकतो व यासाठी चीनने योजनाबद्धरित्या पावले उचललेली आहेत, याची जाणीव लष्करप्रमुखांनी याद्वारे करून दिली. अशी राक्षसी महत्त्वाकांक्षा असलेला देश अमेरिकेची जागा घेऊन महासत्ता बनण्याच्या दिशेने वेगाने पावले उचलत असताना त्यापासून भारताने सावध राहण्याची आवश्यकता आहे, हे देखील थेट उल्लेख न करता लष्करप्रमुखांनी लक्षात आणून दिले. विशेषतः चीनलगतच्या सीमेवरील परिस्थितीबाबत बोलताना लष्करप्रमुख पांडे यांनी भारत या सीमाभागाकडे अत्यंत सावधपणे पाहत असल्याचे म्हटले आहे.

भारत व चीनच्या सीमेवर बारकाईने नजर ठेवणे आवश्यक आहे. इथल्या एलएसीवर पुन्हा चीनने घुसखोरीचा प्रयत्न केलाच तर इथली परिस्थिती चिघळून त्यातून संघर्ष पेट घेऊ शकतो, असे जनरल पांडे पुढे म्हणाले. ही शक्यता लक्षात घेऊन भारतीय लष्कराने एलएसीवर कुठल्याही आकस्मिक घटनेला तोंड देण्याची पूर्ण सज्जता ठेवलेली आहे, असा इशाराही यावेळी लष्करप्रमुखांनी दिला.

हिंदी

 

leave a reply