सुदानच्या राजधानीवर जोरदार हवाई हल्ले

खार्तूम – मंगळवारी सकाळी सुदानची राजधानी खार्तूमवर जोरदार हवाई हल्ले झाले. यानंतर सुदानचे लष्कर आणि ‘रॅपिड सपोर्ट फोर्सेस-आरएसएफ’ या निमलष्करी दलामध्ये सुरू असलेला संघर्ष अधिकच तीव्र झाल्याचे दावे केले जातात. राजधानी खार्तूम ताब्यात घेण्यासाठी लष्कर व आरएसएफमध्ये सुरू असलेल्या या घनघोर संघर्षामुळे सात लाख जण विस्थापित झाले आहेत. तर दोन लाखाहून अधिक सुदानी नागरिकांनी सुरक्षेसाठी शेजारच्या देशांमध्ये धाव घेतली. खार्तूममध्ये कुवैत व जॉर्डन या देशांच्या दूतावासावर काहीजणांनी हल्ले चढवून मोडतोड केल्याच्याही बातम्या आल्या आहेत.

सुदानच्या राजधानीवर जोरदार हवाई हल्लेसुदानमध्ये लष्कर व आरएसएफ यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाला महिन्याहून अधिक काळ उलटला आहे. हा संघर्ष रोखण्यासाठी सुरू असलेल्या वाटाघाटी फिस्कटल्या आहेत. हा संघर्ष पुढच्या काळात अधिक भीषण स्वरूप धारण करील आणि सिरियात तसेच इतर आखाती देशांमधील रक्तपातापेक्षाही भीषण परिस्थिती सुदानमध्ये पहायला मिळेल, अशी चिंता व्यक्त करण्यात येत आहे. तर हा संघर्ष केवळ सुदानी लष्कर व निमलष्करी दल असलेल्या आरएसफमधील नाही. तर सुदानी लष्कराच्या मागे असलेल्या रशिया व आरएसएफच्या मागे उभ्या राहिलेल्या अमेरिकेमधील हा अप्रत्यक्ष संघर्ष असल्याचे दावे केले जातात. आखाती देश देखील या संघर्षात अप्रत्यक्षरित्या सहभागी झाल्याचे दिसत आहे.सुदानच्या राजधानीवर जोरदार हवाई हल्ले

याचे पडसाद राजधानी खार्तूममध्ये उमटले आहेत. इथल्या कुवैत आणि जॉर्डन या देशांच्या दूतावासावर मंगळवारी हल्ले झाले. काहीजणांनी या दूतावासांमध्ये घुसून तोडफोड केली. कुवैतने याचा निषेध केला आहे. तसेच सौदी अरेबियाने देखील याची गंभीर दखल घेऊन या हल्ल्याचा निषेध केला. सुदानमधील दोन्ही बाजूंनी शांत राहून वाटाघाटींसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने केले आहे.

आत्तापर्यंत सुदानमधील या रक्तपातामध्ये ६७६ जणांचा बळी गेला असून जखमींची संख्या साडेपाच हजारांहून अधिक असल्याचे सांगितले जाते. मात्र जाहीर करण्यात आले आहे, त्याहूनही बळी व जखमींची संख्या कितीतरी अधिक असल्याची चिंता व्यक्त केली जाते.

हिंदी

 

leave a reply