रशिया व इराणचे सहकार्य अमेरिकेला हादरविणारे ठरेल

- अमेरिकी अभ्यासकांचा इशारा

वॉशिंग्टन – युक्रेनची राजधानी किव्ह व इतर ठिकाणी पायाभूत सुविधांवर हल्ले चढविण्यासाठी रशिया इराणकडून अधिक ड्रोन्स मिळविण्याची तयारी करीत आहे. तर गेल्या वर्षाच्या ऑगस्ट महिन्यापासून इराणने रशियाला सुमारे ४०० युएव्ही पुरविले आहेत. तसेच रशियाच्या मागणीनुसार अधिक ड्रोन्सचा पुरवठा करण्याची तयारीही इराणने केली आहे, असा आरोप अमेरिकेच्या व्हाईट हाऊसचे प्रवक्ते जॉन किरबाय यांनी केला. तर रशिया व इराणचे सहकार्य अमेरिकेला हादरविणारे ठरेल, असा इशारा अमेरिकी अभ्यासगटाच्या दोन अभ्यासकांनी दिला. युरोप, युरेशिया आणि आखाती क्षेत्रात हाहाकार माजविण्याच्या आधी, या दोन्ही देशांना रोखण्यासाठी अमेरिकेने पावले उचलावी, असे या अभ्यासकांनी बजावले आहे.

रशिया व इराणचे सहकार्य अमेरिकेला हादरविणारे ठरेल - अमेरिकी अभ्यासकांचा इशारायुक्रेनचे युद्ध सुरू झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यातच रशियाने युक्रेनवर हल्ल्यासाठी इराणी बनावटीच्या ड्रोन्सचा वापर केल्याचे आरोप झाले होते. त्यावर अमेरिका व युरोपिय देशांमधून प्रतिक्रिया आली होती. इराणने मात्र आपण रशियाला ड्रोन्स पुरवित नसल्याचे सांगून हे आरोप फेटाळले होते. पण आता व्हाईट हाऊसचे प्रवक्ते जॉन किरबाय यांनी गेल्या वर्षाच्या ऑगस्ट महिन्यापासून आत्तापर्यंत इराणने रशियाला सुमारे ४०० युएव्हीज्‌‍ पुरविल्याचा आरोप केला. या शाहेद श्रेणीत येणाऱ्या युएव्हीचा वापर युक्रेनची राजधानी किव्ह व इतर भागांमधील पायाभूत सुविधा प्रकल्पांवर हल्ले चढविण्यासाठी रशिया करीत असल्याचे किरबाय पुढे म्हणाले. तसेच इराणकडून अधिक ड्रोन्स मिळविण्याच्या तयारीत असल्याचा दावा देखील किरबाय यांनी केला. युद्धासाठी शस्त्रास्त्रांचा साठा कमी पडत असताना, रशिया इराणमधून मिळणाऱ्या या ड्रोन्सवर मोठ्या प्रमाणात अलंबून असल्याचा दावा किरबाय यांनी केला.

किरबाय यांचा हा आरोप प्रसिद्ध होत असतानाच, हेरिटेज फाऊंडेशन या अमेरिकेच्या आघाडीच्या अभ्यासगटाचे अभ्यासक जेम्स फिलिप्स आणि पीटर ब्रूक्स यांनी रशिया व इराणच्या सहकार्यापासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. रशिया व इराणचे सहकार्य पाचशे वर्षांपासून चालत आल्याचे सांगून याला फार मोठा इतिहास असल्याची जाणीव या दोन्ही अभ्यासकांनी करून दिली. पुढच्या काळात रशिया व इराणमधील सहकार्य युरोप, युरेशिया आणि आखाती क्षेत्रात हाहाकार माजवू शकेल, असे सांगून अमेरिकेने याच्या विरोधात वेळीच पावले उचलावी, अशी मागणी जेम्स फिलिप्स आणि पीटर ब्रूक्स यांनी केली आहे.

रशिया व इराणचे सहकार्य अमेरिकेला हादरविणारे ठरेल - अमेरिकी अभ्यासकांचा इशाराइराण व रशियावर निर्बंध लादून या देशांची क्षमता कमी करण्यात अमेरिकेला अपयश आले आहे. इराण तर अमेरिकेच्या निर्बंधांनंतरही आपल्या देशात मोठ्या प्रमाणात हल्ला चढवू शकणाऱ्या ड्रोन्सची निर्मिती करीत आहे. याचे प्रमुख कारण दोन्ही देशांकडून केली जाणारी इंधनाची निर्यात अजूनही कायम आहे. या देशांना रोखण्यासाठी अमेरिकेने आपल्या इंधनतेल व इंधनवायूची इतर निर्यात करावी, असा सल्ला जेम्स फिलिप्स आणि पीटर ब्रूक्स यांनी दिला. यामुळे इंधनाच्या निर्यातीवर अवलंबून असलेल्या रशिया व इराणला धक्का बसेल, असा दावा या दोन्ही अभ्यासकांनी केला आहे.

ही मागणी करीत असताना, इराण व रशियाच्या सहकार्यामुळे आखाती क्षेत्रात झालेल्या बदलांकडे जेम्स फिलिप्स आणि पीटर ब्रूक्स यांनी लक्ष वेधले. चीनच्या मध्यस्थीने इराण व सौदीमध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले, त्याला इराणच्या रशियाबरोबरील सहकार्याचा फार मोठा आधार असल्याचे या दोन्ही अभ्यासकांचे म्हणणे आहे. तसेच अस्साद यांच्या राजवटीखाली असलेल्या सिरियाला पुन्हा एकदा अरब लीगचे सदस्यत्त्व मिळाले, त्यामागे देखील रशिया व इराणचे सहकार्य असल्याचा निष्कर्ष फिलिप्स व ब्रूक्स यांनी नोंदविला.

या साऱ्या गोष्टी अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाला धक्का देणाऱ्या असून अधिक अनर्थ टाळायचा असेल, तर अमेरिकेला आत्तापासूनच रशिया व इराणच्या सहकार्याविरोधात पावले उचलावी लागतील, असे या दोन्ही अभ्यासकांचे म्हणणे आहे. त्याचवेळी बायडेन प्रशासनाने इराणसंदर्भात स्वीकारलेल्या भूमिकेवर जेम्स फिलिप्स आणि पीटर ब्रूक्स यांनी सडकून टीका केली आहे.

हिंदी

 

leave a reply