विदर्भासह मध्य भारताला अतिवृष्टी व पुराचा फटका

नागपूर/नवी दिल्ली – गेले काही दिवस सतत सुरू असणाऱ्या अतिवृष्टीमुळे नर्मदा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून, मध्य प्रदेशमध्ये आलेल्या पुरात गेल्या २४ तासात १० जणांचा बळी गेला आहे. नदीच्या पाण्याची पातळी सातत्याने वाढत असल्याने हजारोजणांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. या राज्यात सुरु असलेल्या पावसामुळे महाराष्ट्रातील विदर्भालाही महापुराचा फटका बसला आहे. नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पूर आला आहे. भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील वैनगंगा नदीला महापूर आल्याने परिस्थिती गंभीर झाली आहे. या पार्श्वभूमीवर, रविवारी पुण्यातून राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाच्या (एनडीआरएफ) चार टीम्स व भारतीय लष्कराचे एक पथक नागपूरला रवाना झाले आहेत.

विदर्भासह मध्य भारताला अतिवृष्टी व पुराचा फटकामध्य प्रदेशप्रमाणे गुजरात, राजस्थान, बिहार व ओडिसामध्येही पाऊस व पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे मध्य प्रदेशात मुसळधार पाऊस पडत आहे. गेल्या २४ तासात झालेल्या पावसाने दहा जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. राज्यात ४७ वर्षांनंतर नर्मदा नदीला पूर आल्यामुळे होशंगाबाद, रायसेन, भोपाळ, सिहोर, विदिषा, छिंदवाडा, बालाघाट, सियोनी, काठी, सागर, शिवपुरी आणि उज्जैन ह्या जिल्ह्यांना पुराचा जोरदार फटका बसला आहे. या पावसामुळे १२ जिल्ह्यातील ४५४ गावे पाण्याखाली गेली आहेत. पूराची परिस्थिती पाहून एनडीआरएफ, सीडीआरएफने नदीकाठच्या रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी नेण्यास सुरूवात केली आहे. आत्तापर्यंत ११ हजारांहून अधिक जणांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मध्य प्रदेशात अतिवृष्टीमुळे आत्तापर्यंत १२९ जणांचा बळी गेला आहे.

विदर्भासह मध्य भारताला अतिवृष्टी व पुराचा फटकामध्य प्रदेशातील सिओनी जिल्ह्यातील संजय सरोवर, महाराष्ट्रातल्या गोंदिया जिल्ह्यातील पुजारीटोला आणि बावनथडी प्रकल्प तसेच पेंच व तोतलाडोह आणि चौराई धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली जिल्ह्यात पूर आला आहे. गोंदियातील एका गावात अडकलेल्या हजारांहून अधिक जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. आत्तापर्यंत १४८ गावांमधील १८ हजारांहून अधिकजणांना सुरक्षित ठिकाणी नेले आहे. पावसाने नागपूर आणि चंद्रपूरमधला पूर ओसरलेला नाही. त्यामुळे ‘एनडीआरएफ’ आणि भारतीय लष्कराचे एक पथक नागपूरला रवाना झाले आहेत.

रविवारी गुजरातमध्ये झालेल्या पावसाने सरदार सरोवराचे दरवाजे उघडले आहेत. या धरणातून ८.४ लाख क्युसेक्स पाणी नर्मदा नदीत सोडण्यात आले आहे. यामुळे भरूच जिल्ह्यातील नर्मदा नदीला पूर आला असून किनाऱ्यालगतच्या दोन हजारांहून अधिक जणांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आहे. रविवारपासून सुरु असलेल्या पावसाने पंचमहाल, राजकोट, बनासकंठा, वडोदरा, अहमदाबाद आणि अन्न जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे.

विदर्भासह मध्य भारताला अतिवृष्टी व पुराचा फटकामध्य प्रदेश, गुजरातप्रमाणे ओडिसालाही पूराचा तडाखा बसला आहे. इथली ५०० गावे पाण्याखाली गेली असून आठ लाख नागरिकांना फटका बसला आहे. या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. रविवारी कटकच्या मुंदाली धरणातून १० लाख क्युसेक पाणी सोडण्यात आले. याने काकझोर, मयूरभंज, जगतसिंगपुर, केंद्रपाडा, रायगढा, गजपति, मल्कानगिरि आणि जाजपुर जिल्ह्यांना पूराचा फटका बसला आहे. पुढील चोवीस तासात या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे

बिहारमध्ये दोन महिन्यांपासून पूरस्थिती कायम असून अर्धा बिहार अद्यापही सावरलेला नाही. छपराच्या अमानौर ब्लॉकच्या सीमावर्ती गावांमध्ये अनेक घरे पाण्याखाली गेली आहेत. बरौली, सिधवलिया आणि बैकुंठपूर येथे पुराचे पाणी कायम आहे. येत्या २४ तासांत राजस्थान, पंजाब, पश्चिम बंगाल, बिहार व कर्नाटकसह देशातील १६ राज्यांना अतिवृष्टीचा फटका बसू शकतो, असा अंदाज ‘नॅशनल वेदर फोररकास्टिंग सेंटर’ने वर्तविला आहे.

leave a reply