मुंबईसह कोकणाला पावसाने झोडपले

- कोल्हापूरात पंचगंगेच्या पातळीत वाढ

मुंबई – सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसामुळे मुंबई ठाण्यासह सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि कोल्हापूरला पावसाने झोडपून काढले आहे. मुसळधार पावसामुळे कोकणातील काही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून त्याचा फटका मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीला बसला. तर कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या पातळीत वाढ झाल्याने महापुराचा धोका वाढला आहे.

Mumbai-Konkan-Rainअरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात एकाचवेळी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे मुंबई, ठाणे, कोकणात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. बुधवारी मुंबई शहर, उपनगर त्याचबरोबर ठाणे, पालघर, रायगडसह कोल्हापूरला पावसाचा तडाखा बसला. मुंबईतील सखल भागात पाणी साचल्याने वाहतुकीवर जबर परिणाम झाला. त्यातच मारिनलाईन्स व चर्नी रोड दरम्यान ओव्हरहेड वायरवर झाड कोसळल्याने आणि भायखळा ते मस्जिद बंदर रेल्वे रुळावर पाणी साठल्याने लोकल सेवेला फटका बसला. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवेत काम करत असलेल्या नागरिकांचे प्रचंड हाल झाले. नवी मुंबई परिसरात मुसळधार पावसामुळे डी. वाय. पाटील स्टेडियमचेही नुकसान झाले असून जेएनपीटीमधील तीन क्रेन देखील पडल्याची घटना घडली.

कोकणात रायगड जिल्ह्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या चोवीस तासात झालेल्या मुसळधार पावसाने वृक्ष उन्मळून पडणे, सखल भागात पाणी साचणे, वीजपुरवठा खंडीत होणे यासारख्या घटना घडल्या आहेत. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. सावित्री नदीला पूर आला असून महाडमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर घोणसे घाटात दरड कोसळल्याने माणगावकडून श्रीवर्धनला जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे.

Mumbai-Konkan-Rainकोकणात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे. या पुराचा फटका गणोशोत्सवानिमित्ताने कोकणात जाणाऱ्यांना चाकरमान्यांना बसला. माणगावजवळ घोड नदीचे पाणी कळमजे पुलावरुन वाहू लागल्याने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी थांबवण्यात आली. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले. कणकवली-खारेपाटण सुखनदीला पूर आल्याने बाजारपेठेसह सर्वत्र पाणी शिरले आहे. सावंतवाडीच्या बांदा बाजारपेठेतही गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.

कोल्हापूरमध्येही मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला असून पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे आजूबाजूच्या गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. या नदीकाठच्या परिसरात राहणाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. शहरातील जुन्या पूलालगत पाणी साचल्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, मंगळवारी मुंबईजवळच्या गोराई समुद्रात ४० मैलावर एक बोट बुडाली. यातल्या अकरा जणांना तटरक्षक दलाने वाचवले असून दोघांचा रात्रीपर्यंत शोध लागलेला नाही. तर पुणे वेधशाळेने पुढील ७२ तासात मुंबई, ठाणे कोकणात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

leave a reply