महाराष्ट्र, तेलंगणामध्ये मुसळधार पावसाचा हाहाकार

- दोन्ही राज्यांमध्ये मिळून ९७ जणांचा बळी

मुंबई/हैदराबाद – बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्र, तेलंगाणाला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. महाराष्ट्रात गेल्या तीन दिवसात अतिवृष्टीमुळे कोंकण, पुणे आणि औरंगाबादमध्ये ४७ जणांचा बळी गेला आहे. याशिवाय सोलापूर, सांगलीतही मुसळधार पावसाने दणादण उडवली असून २० हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. तसेच तेलंगणामध्ये ५० जणांचा या आपत्तीमध्ये मृत्यू झाला.

मुसळधार

बुधवारपासून पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर. पुणे, सातारा आणि सांगलीमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. पश्चिम महाराष्ट्रात गेल्या तीन दिवसात २८ जणांचा बळी गेला आहे. तसेच येथील २० हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. सोलापूरला मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका बसला असून जिल्ह्यातील १७ हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. तर पुणे आणि सांगली जिल्ह्यात अनुक्रमे तीन हजार आणि एक हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याचे पुणे विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

मुसळधारदोन दिवसांपूर्वी पंढरपूरमध्ये घाटाची भिंत कोसळून सहा जणांचा बळी गेला होता, तर पुणे जिल्ह्यात दौंडमध्ये चार जण वाहून गेले. इंदापूर, दौंड, बारामती या भागांत अतिवृष्टी झाली असून बारामती-फलटण रस्ता वाहून गेला. येथील १८ गावे पूरग्रस्त असून राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाकडून या भागात मदत आणि बचाव कार्य हाती घेण्यात आले आहे. मुसळधार पावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पुणे, सोलापूर, सातारा आणि सांगली या चार जिल्ह्यात ५७ हजार हेक्टरवरील ऊस, सोयाबीन, कापूस, डाळिंब पिकाला मोठा फटका बसला आहे. तसेच ५१३ गुरांचा मृत्यू झाला असून २३१९ घरांचे मोठे नुकसान झाले आहे.

मराठवाड्याला देखील पावसाचा फटका बसला. औरगांबाद विभागात १३ तालुक्यांमध्ये ६५ एमएम पाऊस झाला आहे. मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. त्याचवेळी धरणातून विसर्ग सुरू झाल्याने कित्येक भागात पाणी साचले आहे. औरंगाबाद विभागात १६ जणांचा अतिवृष्टीमुळे बळी गेल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. तसेच ४,९९००० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये बाजरी, केळी, कापूस, मका, सूर्यफूलाच्या पिकांना सर्वाधिक फटका बसला आहे. उस्मानाबादमधील १ लाख ३६ हजार हेक्टर आणि नांदेडमधी १ लाख १० हजार हेक्टरवरील पिकांची नासाडी झाली आहे.

कोकणात पावसामुळे तीन जणांचा बळी गेला आहे. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे. सिंधुदुर्गमधील वैभववाडी, रायगडमधील कर्जत, खालापूर, मुरुड, पेण आणि अलिबागमध्ये गेल्या काही दिवसात दिवसात १०० एमएमपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात भातशेतीचे एकूण क्षेत्र ६८ हजार हेक्टर असून त्यातील ३० टक्के भातशेतीला पावसाचा फटका बसला आहे. जिल्ह्यातील नदी-नाले दुथडी भरून वाहत असून राजापूर तालुक्यातील अर्जुना, कोदवली आणि रत्नागिरी तालुक्यातील काजळी नदीला पूर आला आहे.

बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र आंध्र, तेलंगण, महाराष्ट्र या दिशेने सरकल्याने या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा फटका बसला. महाराष्ट्रासह तेलंगणा , आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यांना मागील दोन दिवसात अतिवृष्टीने झोडपून काढले आहे. येथील बहुतेक ओढ्यांना आणि नाल्यांना पूर आला आहे. रस्ते वाहून गेल्याने अन्य भागांशी संपर्क तुटला आहे. तेलंगणात पावसाने गेल्या १०० वर्षातील विक्रम मोडला आहे. मुसळधार पावसामुळे ओढवलेल्या पूर्वपरिस्थितीत ५० नागरिकांचा बळी गेला आहे. हैदराबाद, इब्राहिमपट्टनम येथील सखल भागांत पाणी साचले असून,कित्येक भागांत घरांची पडझड झाली आहे. एका आकडेवारीनुसार या पावसामुळे जवळजवळ पाच हजार कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

leave a reply