उत्तराखंडमध्ये वायुसेनेकडून ‘एअर डिफेन्स रडार्स’ उभारण्यासाठी हालचाली

नवी दिल्ली – उत्तराखंडमध्ये वायुसेनेने ‘एअर डिफेन्स रडार्स’ आणि नवे ‘अँडव्हान्स लँडिंग ग्राऊंडस'(एएलजी) उभारण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. शुक्रवारी हवाईदलाच्या सेंट्रल एअर कमांडचे वरिष्ठ अधिकारी एअर चीफ मार्शल राजेश कुमार यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत यांची भेट घेतली. यावेळी जमीन संपादन, एअर डिफेन्स सिस्टीम आणि इतर मुद्यांवर चर्चा पार पडली. लडाखमधील गलवान व्हॅलीतील चीनबरोबरील संघर्षानंतर उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी वायुसेना उत्तराखंडमध्ये ‘एएलजी’विकसित करु शकते, असा प्रस्ताव दिला होता.

उत्तराखंडमध्ये वायुसेनेकडून 'एअर डिफेन्स रडार्स' उभारण्यासाठी हालचालीउत्तराखंडची सीमा चीनला भिडलेली आहे. त्यामुळे सामरिकदृष्टया उत्तराखंडमध्ये ‘एअर डिफेन्स रडार्स’ आणि ‘एएलजी’साठी सुरु असेलेल्या हालचाली महत्वाच्या ठरतात. चीनलगतच्या चमोली, पिठोरागड, आणि उत्तरकाशी जिल्ह्यांच्या भागात ही रडार यंत्रणा आणि ‘एएलजी’ विकसित करण्यात येणार आहे.

एअर मार्शल राजेश कुमार यांनी उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्याकडे पटनागर, जॉली ग्रँट आणि पिथरोगड या विमानतळांचा विस्तार करण्यासाठी जमीन उपलब्ध करुन देण्याचीही विनंती केली आहे. तसेच उत्तराखंडमध्ये रडार्स आणि धावपट्ट्यांच्या उभारण्यासाठी निवडलेली जागा सध्याच्या परिस्थितीला अनुकूल असल्याचे एअर मार्शल कुमार यांनी म्हटले. उत्तराखंडच्या स्थानिकांनीही देशाच्या संरक्षणासाठी घेण्यात आलेल्या या निर्णयावर आनंद व्यक्त केला आहे.

leave a reply