जम्मू-कश्मीरमध्ये ‘हिजबुल’चा कमांडर सैफुल्लाह मीर चकमकीत ठार

श्रीनगर – जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमध्ये सुरक्षादलांचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर सैफुल्लाह मीर ठार झाला. नुकतेच जम्मू काश्मीरमध्ये तीन राजकीय कार्यकर्त्यांच्या हत्या करण्यात आली होती. यामागे सैफुल्लाह होता, असे तपास यंत्रणांचे म्हणणे आहे. त्यामुळे सैफुल्लाह ठार झाल्याने ‘हिजबुल’ला मोठा झटका बसल्याचे म्हटले जात आहे. तसेच आधीच कमकुवत झालेली ‘हिजबुल’ पुन्हा एकदा नेतृत्वहीन झाली आहे.

सैफुल्लाह मीर

श्रीनगरच्या रंगरेथ भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यावर जम्मू काश्मीर पोलीस व सीआरपीएफच्या जवानांनी संयुक्त मोहीम हाती घेतली होती. सुरक्षादलांच्या जवानांनी घेरल्याचे लक्षात येताच दहशतवाद्यांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली. यावेळी उडालेल्या चकमकीत हिजबुलचा कमांडर सैफुल्लाह उर्फ डॉक्टर साहब ठार झाला, अशी माहिती जम्मू काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबग सिंग यांनी दिली. या चकमकीदरम्यान सैफुल्लाहच्या एका सहकाऱ्याला अटक करण्यात आली .

यावर्षीच्या सुरुवातीलाच जम्मू-कश्मीरमध्ये पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियांवर हल्ल्याचे सत्र सुरु करणारा हिजबुलाचा कमांडर रियाज नायकू चकमकीत ठार झाला होता. त्यानंतर सैफुल्लाहला नायकूच्या जागी हिजबुलचा कमांडर बनविण्यात आले होते. सैफुल्लाह मीर हा गाझी हैदर व डॉक्टर साहब या नावाने ओळखला जात होता.

ऑक्टोबर २०१४ मध्ये सैफुल्ला हिजबुल मुजाहिद्दीनमध्ये दाखल झाला होता. सैफुल्ला पुलवामा येथील मलंगपोरा येथील रहिवासी होता. रियाज नायकूनेच त्याला दहशतवादी संघटनेत भरती केले होते आणि त्याला गाझी हैदर हे नाव दिले. दक्षिण काश्मीरमधून तो श्रीनगरमध्ये आल्याची माहिती सुरक्षादलांना मिळाली होती. या कारवाईत दोन ते तीन दहशतवादी ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र सुरक्षादलांनी अद्याप याला दुजोरा दिलेला नाही.

leave a reply