हिजबुल्लाहने बैरूतमध्ये आणखी एका ठिकाणी स्फोटके लपविली

- इस्रायलच्या पंतप्रधानांचा आरोप

जेरूसलेम – लेबेनॉनची राजधानी बैरूतमध्ये आणखी एक मोठी दुर्घटना प्रतिक्षेत आहे. बैरूतच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील नागरी वस्तीत हिजबुल्लाहने मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्रांचा साठा केला आहे. त्यामुळे लेबेनीज जनतेने भीषण दुर्घटनेची वाट न पाहता, हिजबुल्लाह तसेच या संघटनेचे समर्थक असलेल्या इराणच्या विरोधात निदर्शने पुकारावीत, असे आवाहन इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत केले. गेल्या महिन्यात बैरूतच्या बंदरातील कोठारात झालेल्या शक्तीशाली स्फोटानंतर नेत्यान्याहू यांच्या या आरोपांचे गांभीर्य वाढले आहे. तर हिजबुल्लाहप्रमुख हसन नसरल्लाने हा आरोप फेटाळला आहे.

बैरूतमध्ये

४ ऑगस्ट रोजी बैरूतच्या बंदरात शक्तीशाली स्फोट झाला होता. यामध्ये २०० हून अधिक जणांचा बळी गेला होता. येथील एका गोदामात अवैधरित्या साठवलेल्या अमोनियम नायट्रेटच्या प्रचंड साठ्यामुळे हा स्फोट झाल्याचे उघड झाले. हिजबुल्लाहनेच हा साठा सदर गोदामात जमा केल्याचा आरोप अमेरिका व इस्रायली माध्यमांनी केला होता. इस्रायलचे पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी संयुक्त राष्ट्रसंघातील आपल्या भाषणात या स्फोटाची आठवण करुन देत बैरूतमध्ये आणखी एक दुर्घटना घडू शकते, असा इशारा दिला. बैरूतच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील जनाह या नागरी भागात बैरूतसारखाच प्रचंड स्फोट होऊ शकतो, असे नेत्यान्याहू यांनी बजावले.

बैरूतमध्ये

गॅस स्टेशन आणि गॅस कंपनीने घेरलेल्या या जनाहच्या वस्तीमध्ये हिजबुल्लाहने रॉकेट व क्षेपणास्त्रांचा मोठा साठा केल्याचा दावा नेत्यान्याहू यांनी केला. वेळीच हिजबुल्लाहच्या या साठ्यावर कारवाई केली नाही तर बैरूत बंदराप्रमाणे येथेही आणखी एक दुर्घटना घडेल, असा इशारा नेत्यान्याहू यांनी दिला. त्यामुळे जनाह तसेच बैरूतमधील जनतेने एकत्र येऊन हिजबुल्लाहच्या या गोदामाविरोधात निदर्शने करावी, असे आवाहन नेत्यान्याहू यांनी केले. तसेच लेबेनॉनच्या जनतेला इस्रायलपासून नाही तर इराणपासून मोठा धोका असल्याचे नेत्यान्याहू म्हणाले. आंतरराष्ट्रीय समुदायाने देखील हिजबुल्लाहच्या या शस्त्रास्त्र गोदामावर कारवाई करावी, अशी मागणी इस्रायलच्या पंतप्रधानांनी या आमसभेत केली.

हिजबुल्लाहप्रमुख हसन नसरल्लाने अवघ्या काही तासात एक व्हिडिओ प्रसिद्ध करुन इस्रायलचा हा आरोप फेटाळला. इस्रायली पंतप्रधान चुकीची माहिती देऊन लेबेनीज जनतेला भडकावित असल्याचा आरोप केला. तर हिजबुल्लाहच्या समर्थकांनी बुधवारी पत्रकारांना घेऊन जनाहचा दौरा केला. इस्रायली पंतप्रधान दावा करीत असलेले गोदाम या ठिकाण नसल्याचा पलटवार हिजबुल्लाहने केला. दोन वर्षांपूर्वी देखील नेत्यान्याहू यांनी आमसभेच्या भाषणातच बैरूतमधील हिजबुल्लाहच्या वेगवेगळ्या भागांचे फोटो दाखवून या ठिकाणी स्फोटके जमा केल्याचा आरोप केला होता. त्यावेळी हिजबुल्लाहने इस्रायलचे आरोप फेटाळले होते. पण महिन्याभरापूर्वी बैरूतमध्ये या ठिकाणी भीषण स्फोट झाले आणि त्यामागे इस्रायल असल्याचा दावा केला जातो. त्यामुळे इस्रायलच्या पंतप्रधानांनी हिजबुल्लाहच्या स्फोटकांबाबत केलेले नवे आरोप म्हणजे नव्या स्फोटाची पूर्वसूचना असावी, असे संकेत मिळत आहेत.

leave a reply