ड्युरंड लाईनवर सीमा शुल्क आकारणाऱ्या पाकिस्तानच्या विरोधात पश्तूंची जोरदार निदर्शने

खैबर पख्तुनख्वा – पाकिस्तानच्या सरकारकडून ड्युरंड लाईनवर सीमा शुल्क लादल्यानंतर दक्षिण वझिरीस्तानमधल्या खैबर पख्तूनख्वामध्ये पश्तूंची जोरदार निदर्शने सुरु केली आहेत. गेल्या अनेक दशकांपासून पश्तूंनी अफगाण- पाकिस्तानच्या ड्युरंड लाईनवरुन व्यापार करतात. पण पाकिस्तानच्या सरकारने सीमाशुल्क लादल्यामुळे व्यापारात अडथळे येत असल्याचे सांगून पश्तू जनतेचा संताप अनावर झाला आहे.

सीमा शुल्क

ड्युरंड लाईनवरच्या अंगुर अड्डा क्रॉसिंग पॉईंटवरुन पाकिस्तानचे पश्तू सीमेपलीकडे मालाचा पुरवठा करतात. पण पाकिस्तानने सीमाशुल्क लादल्यामुळे स्थानिक व्यापारावर परिणाम झाला. तसेच जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढले. यामुळे हतबल झालेल्या पश्तू जनतेने पाकिस्तानच्या सरकारविरोधात रविवारपासून निदर्शने सुरु केली आहेत.

पाकिस्तान अफगाणिस्तानच्या ड्युरंड लाईन सीमाक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पश्तू नागरिक राहतात. पाकिस्तान सरकार जाणूनबुजून आपल्याला लक्ष्य करीत असल्याचा आरोप पश्तूंनी केला. तसेच या क्षेत्रात वीज आणि इंटरनेटचा अभाव आहे. याचा परिणाम पश्तू जनतेच्या दैनंदिन जीवनावर होत असल्याचे सांगून याविरोधातही त्यांनी आवाज उठविला . ड्युरंड लाईनवर अनेकवार पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये संघर्ष पेटतो. अफगाणिस्तानला ही ड्युरंड लाईन मान्य नाही. आता ड्युरंड लाईनवर सीमाशुल्क लादून पाकिस्तानने हा सीमावाद नव्याने पेटवला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पश्तू जनतेने पाकिस्तानमध्ये भव्य मोर्चा काढून दहशतवाद माजविणाऱ्या पाकिस्तान सरकार आणि लष्कराला इशारा दिला होता. पाकिस्तानी लष्कराकडून पश्तूंचा वंशसंहार सुरु असल्याच्या आरोप पश्तू जनता करीत आहे. याविरोधात पश्तूंनी भव्य आंदोलन पुकारले आहे.

leave a reply