संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक संपन्न

नवी दिल्ली – लडाखमध्ये भारत आणि चीनमध्ये कोणत्याही क्षणी संघर्ष भडकण्याची स्थिती असताना, शुक्रवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरिय बैठक पार पडली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल, संरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावत आणि तिन्ही संरक्षणदलाचे प्रमुख या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत लडाखमधील परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील व्यूहरचनेवर चर्चा पार पडली.

संरक्षणमंत्री

लडाखमध्ये भारत आणि चीन दोन्ही देशांचे जवान एकमेकांसमोर खडे ठाकले आहेत. तसेच भारतीय सैन्याने लडाखमध्ये चीनच्या सीमेवरील मोक्याची ठिकाणी सज्जता वाढविली असल्याच्या आणि आपली स्थिती बळकट केल्याच्या बातम्या येत आहेत. या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये संरक्षणमंत्र्याच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या बैठकीचे महत्व वाढते.

यावेळी लडाखच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आणि पुढील व्यूहरचना ठरविण्यात आली. या बैठकीचे तपशील प्रसिद्ध झालेले नाहीत. काही तासांपूर्वीच संरक्षणमंत्र्यांनी रफायल विमानांचा वायुसेनेतील समावेश भारतीय सार्वभौमत्वाच्या आव्हानाला जरब बसविणारा संदेश असल्याचा इशारा दिला होता. त्यानंतर ही बैठक पार पडली आहे.

तसेच शुक्रवारी सरंक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली विशेष मंत्रिगटाच्या समितीने ऑर्डीनस फॅक्टरी बोर्डाच्या (ओएफबी) कामकाजाचाही आढावा घेतला. आत्मनिर्भर भारत अंतर्गत भारतातच संरक्षण साहित्याच्या निर्मितीवर भर देण्यात येत आहेत. काही दिवसांपूर्वीच संरक्षणमंत्रालयाने १०१ संरक्षण साहित्याच्या आयातीवर बंदी घातली होती. तसेच लडाखमधील चिघळलेली परिस्थिती पाहता दारू गोळा, शास्त्रांच्या निर्मिती आणि पुरवठयाची जबाबदरी ऑर्डीनस फॅक्टरीवर वाढली आहे. यापार्श्वभूमीवर सरंक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी ‘ओएफबी’चा घेतलेला आढावा महत्वाचा ठरतो.

दरम्यान, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी शुक्रवारी ‘एरो इंडिया-२०२१’शो च्या वेबसाईटचे अनावरण केले. पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात तीन ते सात फेब्रुवारी दरम्यान बंगळुरूमध्ये भव्य ‘एरो इंडिया’शो पार पडणार आहे. या एरो इंडियामध्ये ६१ विमाने सहभागी होणार असल्याची माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी यावेळी दिली. तसेच ब्रिटन या एरो इंडियामध्ये सहभागी होण्यासाठी उत्सुक आहे. ‘एरो इंडिया-२०२१’ला दोन लाखांहून अधिक जण भेट देणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो.

leave a reply