भारताचे परराष्ट्र सचिव श्रिंगला व ‘आसियन’ राजदूतांची बैठक

नवी दिल्ली – आग्नेय आशियाई देशांचे राजदूत व भारताचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रिंगला यांच्यात गुरुवारी विशेष बैठक झाली. भारत व ‘आसियन’ देशांमध्ये सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी विविध उपक्रमांना गती देण्यासंदर्भात यावेळी चर्चा झाल्याची माहिती परराष्ट्र विभागाने दिली. चीनबरोबरील तणावाच्या पार्श्वभूमीवर आग्नेय आशियाई देशांचा प्रभावी गट असणाऱ्या ‘आसियन’कडून सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रमुख देशांबरोबर चर्चा सुरु आहे. अशा वेळी ‘आसियन’ राजदूतांनी भारतीय सचिवांबरोबर घेतलेली बैठक महत्वाची ठरते.

'आसियन'

भारताच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी परराष्ट्र सचिव श्रिंगला व ‘आसियन’मधील बैठकीची माहिती दिली. “‘ॲक्ट ईस्ट’ धोरणाला गती देण्यासाठी वेगाने हालचाली सुरु आहेत. आसियन देशांच्या राजदूतांनी परराष्ट्र सचिव श्रिंगला यांची भेट घेतली. यावेळी ‘ईस्ट’साठीचे सचिव विजय ठाकुर सिंगही उपस्थित होते. भारत व आसियनमध्ये सहकार्य दृढ करण्यासाठी नव्या उपक्रमांवर चर्चा झाली”, असे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी सांगितले.

गेले काही महिने जगभरात कोरोना साथीचा फैलाव सुरू असतानाच चीनकडून मात्र शेजारी देशांविरोधात चिथावणीखोर कारवाया चालू आहेत. चीनच्या या कारवायांना भारतासह आग्नेय आशियाई देशांनी जबरदस्त आव्हान दिले आहे. चीनविरोधातील आघाडी अधिक व्यापक करण्यासाठी भारत आणि ‘आसियन’ सामरीक तसेच आर्थिक क्षेत्रातील सहकार्य वाढवित आहेत. गुरुवारी ‘आसियन’ राजदूतांनी भारताच्या परराष्ट्र सचिवांबरोबर केलेली चर्चा त्याचाच भाग दिसत आहे.

'आसियन'

दरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी ‘आसियन’ देशांनी चीनच्या दादागिरीला बळी पडू नये, असे आवाहन केले. गुरुवारी अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांची ‘आसियन’ गटाबरोबर ऑनलाईन समिट पार पडली. यावेळी त्यांनी आग्नेय आशियाई देशांनी चिनी कंपन्यांबरोबरचे संबंध तोडावेत, अशी आग्रही भूमिका मांडली. अमेरिकेने काही दिवसांपूर्वीच साऊथ चायना सी मध्ये कृत्रिम बेटे उभारणाऱ्या चिनी कंपन्यांवर निर्बंध घातले होते. ‘आसियन’ देशांनीही या चिनी कंपन्यांना थारा देऊ नये, असे अमेरिकेने म्हंटले आहे.

‘आसियन’चे सदस्य असणाऱ्या मलेशिया, म्यानमार व थायलंड या देशांनी गेल्या काही महिन्यात चीनच्या ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटीव्ह’अंतर्गत अनेक महत्त्वाचे प्रकल्प रद्द करून चीनला झटका दिला आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकी परराष्ट्रमंत्र्यांनी केलेले आवाहन लक्ष वेधून घेणारे ठरते.

leave a reply