अफगाणिस्तानातून ३५७ हिंदू व शीख निर्वासित भारतात दाखल

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांची माहिती

नवी दिल्ली – मार्चपासून अफगाणिस्तानातून तेथील अल्पसंख्यांक समुदायांंचे ३५७ निर्वासित भारतात आश्रयासाठी दाखल झाले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी ही माहिती दिली. मार्च महिन्यात अफगाणिस्तानात शीख समुदायाला लक्ष्य करून मोठा आत्मघाती हल्ला झाला होता. तालिबानचे वाढते दहशतवादी हल्ले आणि अपहरणांमुळे अल्पसंख्यांकाना अफगाणिस्तानात असुरक्षित वाटत आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने तेथील अल्पसंख्यांक हिंदू आणि शीख निर्वासित भारतात दाखल होत आहेत.

अफगाणिस्तानातून ३५७ हिंदू व शीख निर्वासित भारतात दाखल - परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांची माहितीमार्च महिन्यात काबूलमध्ये शीख समुदायाला लक्ष्य करुन तालिबानने घडविलेल्या आत्मघाती हल्ल्यात २५ जणांचा बळी गेला होता. तसेच जलालाबादमध्ये झालेल्या हल्ल्यात १४ हिंदू व शीख धर्मियांचा बळी गेला होता. या हल्ल्यानंतर अफगाणिस्तानातील आणि शीख समुदायाच्या नागरिकांनी भारतात कायमस्वरूपी आश्रयासाठी विनंती केली होती. याचा विचार करुन भारताने त्यांना आश्रय दिला असून पुढील काळात ‘नागरी संशोधन कायदा'(सीएए)अंतर्गत त्यांना नागरिकत्व देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते.

अफगाणिस्तानातल्या अल्पसंख्यांकावरचे वाढते हल्ले आणि त्यांचे अपहरण भारतासाठी चिंतेची बाब होती. भारताच्या अफगाणिस्तानातील दूतावासाने त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी घेऊन त्यांना कोरोनाव्हायरसच्या नियमावलीनुसार सुखरुप भारतात आणल्याचे अनुराग श्रीवास्तव यांनी म्हटले आहे. लॉकडाऊननंतर अफगाणिस्तानातून भारतात ३५७ हिंदू आणि शीख निर्वासित आले आहेत. भारतातला शीख समुदाय त्यांना सर्वोतोपरी सहाय्य करीत असल्याचे अनुराग श्रीवास्तव म्हणाले.

दरम्यान, जुलै महिन्यात अफगाणिस्तानातील ११ शीख निर्वासितांची पहिली बॅच भारतात दाखल झाली होती. त्यानंतर टप्प्याटप्प्याटप्प्याने अफगाणिस्तानातून हिंदू आणि शीख निर्वासित भारतात दाखल झाले. साधारण तीन दशकांपूर्वी अफगाणिस्तानात अडीच लाख हिंदू आणि शीखधर्मिय होते. पण वाढता दहशतवाद, हिंसाचार या कारणांमुळे अफगाणिस्तानात केवळ १३५० हिंदू आणि शीखधर्मिय कुटुंबे शिल्लक आहेत. आता हे नागरिक अफगाणिस्तानातल्या असुरक्षित वातावरणांमुळे भारतात परतत आहेत.

leave a reply