जम्मू-कश्मीरमध्ये परतणाऱ्या काश्मिरी पंडितांसाठी प्रशासनात नोकऱ्या राखीव

श्रीनगर – काश्मीरमध्ये परतणाऱ्या काश्मिरी पंडितांना येथील प्रशासनात नोकऱ्यांच्या संधी खुल्या करण्यात आल्या आहेत. सध्या काश्मिरी पंडित तरुणांसाठी सुमारे दोन हजार पदे राखीव ठेवण्यात आली असून ती लवकरच भरली जाणार आहेत. जम्मू- काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली जम्मू- काश्मीर प्रशासनाने हा निर्णय घेतला.

जम्मू-कश्मीरमध्ये परतणाऱ्या काश्मिरी पंडितांसाठी प्रशासनात नोकऱ्या राखीवपंतप्रधान पॅकेज अंतर्गत काश्मीरमध्ये कायमस्वरूपी परतणाऱ्या काश्मिरी पंडितांना प्रशासनात नोकऱ्या देण्यात येणार आहेत. जम्मू- काश्मीर प्रशासनाने नोकरी भरतीसाठी लेखी परीक्षा, कौशल्य चाचणीला परवानगी दिली. ‘जम्मू-काश्मीर सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड’अंतर्गत आपत्तकालीन विभाग, पुनर्वसन आणि बांधकाम विभागात विविध पदांसाठी काही जागा काश्मीर पंडित असलेल्या तरुणांसाठी राखीव ठेवल्या जातील.

एकूण १९९७ पदे भरण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये अर्थविभागात ९९७ जागा, कृषी आणि शेतकरी कल्याण विभागात १५० जागा, अन्न आणि ग्राहक विभागात ३०० जागा व कर विभागातल्या चतुर्थ श्रेणीसाठी ५५० जागा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. योग्यतेच्या आधारावर ही पदे भरली जातील, असे प्रशासनाने म्हटले आहे.

२०१५ साली पंतप्रधानांनी घोषित केलेल्या रोजगार पॅकेज अंतर्गत तीन हजार पदे भरण्यात येणार होती. यातील केवळ ८०६ जागा भरल्या गेल्या आहेत. तर उर्वरित १,१९७ रिक्त जागांवर आता काश्मिरी पंडितांना संधी देण्यात आली आहे. यामुळे काश्मीरमध्ये कायमस्वरूपी रहायला येणाऱ्या काश्मिरी पंडितांना रोजगार मिळेल .

दरम्यान, १९९० च्या दशकात जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडितांच्या मोठ्या प्रमाणावर हत्या केल्या होत्या. काश्मिरी पंडितांना अत्याचार सहन करावा लागला होता. यामुळे आपली राहती घरे, जमीन जुमला, दुकाने तशीच मागे सोडून हजारो काश्मिरी पंडितांना काश्मीर सोडणे भाग पडले होते. गेल्यावर्षी जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटविल्यानंतर काश्मिरी पंडितांचे पुन्हा काश्मीरमध्ये पुनर्वसन करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. काही काश्मिरी कुटुंब पुन्हा काश्मीर खोऱ्यात परतली आहेत. यापार्श्वभूमीवर हा निर्णय महत्वाचा ठरतो.

leave a reply