‘हिजबुल’ जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला घडविण्याच्या तयारीत – गुप्तचर यंत्रणेचा इशारा

श्रीनगर – जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी मारले जात असल्याने हताश झालेल्या ‘हिजबुल मुजाहिदीन’कडून मोठा दहशतवादी हल्ला घडविण्याची तयारी सुरु असल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. यावर्षात ‘हिजबुल’च्या ८० दहशतवाद्यांना सुरक्षादलांनी ठार केले आहे. यामध्ये रियाज नायकू याच्यासह काही प्रमुख कंमाडरचा समावेश आहे. त्यामुळे काश्मीर खोऱ्यात दहशतवादी कारवायांना गती देण्याची योजना हिजबुलने आखली असून यासाठी ‘हिजबुल’मध्ये तरुणांची भरती करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा अहवाल गुप्तचर संघटनांनी दिला आहे.

काही दिवसांपूर्वी हिजबुलचा कंमाडर रियाज नायकू सुरक्षा दलाच्या कारवाईत मारला गेला. त्याच्या मृत्यूने आपल्याला फार मोठा हादरा बसला आहे, अशी कबुली हिजबुल मुजाहिदीनचा प्रमुख सय्यद सलाउद्दीन याने दिली होती. यावेळी सलाहुद्दीन याने ‘इस वक्त दुश्मन का पलडा भारी है ‘ अशा शब्दात आपली दहशतवादी संघटना कमकुवत झाल्याचे मान्य केले होते. जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलाच्या या कारवाईमुळे हिजबुलचे दहशतवादी हताश झाले आहेत. ‘हिजबुल’ कमकुवत बनली आहे. यापार्श्वभूमीवर हिजबुलचे दहशतवादी सुरक्षादलांना लक्ष्य करून आपले अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्नात आहेत. तसेच रियाज नायकू व अन्य कंमाडरांच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी मोठ्या हल्ल्याचा कट आखला जात असल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. सीमेपलीकडून ‘हिजबुल’च्या दहशतवाद्यांना पुढील दहा दिवसात काश्मीरमध्ये मोठे हल्ले करण्याचे आदेश मिळाले आहेत, असा अहवाल गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे.

दक्षिण काश्मीरमधून हिजबुलच्या दहशतवाद्यांचा एक गट किश्तवाडमध्ये दाखल झाला आहे. हा गट इथल्या स्थानिक काश्मिरी तरुणांना एकत्र करण्याचे काम करीत असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. या गटाचे नेतृत्व स्वीकारण्यासाठी हिजबुलचा अशरफ मौलवी हा दहशतवादी अनंतनागमधून किश्तवाडमध्ये पोहोचलेला आहे. तसेच आपल्या दहशतवादी कारवाया यशस्वी करण्यासाठी हिजबुलने स्थानिक तरूणांना भडकविण्याची योजना आखली आहे. दहशतवादी हल्ले करताना या तरूणांचा सुरक्षा दलावर दगडफेक करण्यासाठी वापर करण्याची योजना असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

leave a reply