अमेरिकेत ट्रम्प प्रशासनाकडून नव्या अणुचाचणीची तयारी – अमेरिकी दैनिकाचा दावा

वॉशिंग्टन – चीन व रशिया छुप्या रितीने अणुचाचण्या घेत असल्याचा दावा करीत अमेरिकेनेही नवी अणुचाचणी करण्याची तयारी सुरू केली आहे. ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ या दैनिकाने हे वृत्त दिले असून वरिष्ठ अधिकारी तसेच माजी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने हा दावा केल्याचे म्हटले आहे. अमेरिकेने यापूर्वी शेवटची अणुचाचणी सप्टेंबर १९९२ मध्ये घेतली होती.

गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या ‘नॅशनल सिक्युरिटी एजन्सी’जची एक बैठक पार पडली. या बैठकीत चीन व रशिया छुप्या रीतीने अणुचाचण्या घेत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. अमेरिकेने ‘रॅपिड टेस्ट’ केल्यास नव्या आण्विक करारासाठी चीन व रशियावर दडपण आणणे शक्य होईल, असा दावा बैठकीत उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी केला.

बैठकीत ठोस निर्णय झाला नसला तरी चाचणी घेण्याबाबत प्रक्रिया सुरू करण्यासाठी हालचाली चालू झाल्याचा दावा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केल्याचे ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ने म्हटले आहे. अमेरिकेच्या ‘नॅशनल सिक्युरिटी कौन्सिल’ने या संपूर्ण प्रकरणात प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या वर्षी ‘न्यूक्लिअर पोश्चर रिव्ह्यू’ नावाने अमेरिकेच्या आण्विक क्षमतेबाबत नवे धोरण जाहीर केले होते. त्यात अमेरिकेची आण्विक क्षमता वाढविणे आणि आधुनिकीकरण यांचा उल्लेख होता. या पार्श्वभूमीवर नव्या अणुचाचणीची चर्चा सुरु होणे लक्षवेधी ठरते.

अमेरिकेत सुरू झालेल्या या चर्चेमागे चीनने काही दिवसांपूर्वी केलेल्या अणुचाचण्यांचेही संदर्भ आहेत.
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या एका अहवालात, चीनने अनेक अणुचाचण्या केल्याचा दावा करण्यात आला होता, असे वृत्त अमेरिकी दैनिकाने गेल्या महिन्यात प्रसिद्ध केले होते. ‘लोप नूर’ या तळावर चीनने या आण्विक चाचण्या केल्या होत्या व यासाठी कमी क्षमतेचा आण्विक स्फोटकांचा वापर केला, असा दावा अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या या अहवालात करण्यात आला होता. या चाचण्या करून चीनने ‘सीटीबीटी’ कराराचे उल्लंघन केल्याचा ठपका देखील अमेरिकेने ठेवला होता. चीनने हे सर्व आरोप नाकारले होते.

चीनच्या अणुचाचण्यांच्या बातमीनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यामध्ये ‘स्टार्ट’ या आण्विक व क्षेपणास्त्र सामंजस्य करारावर चर्चा झाल्याची बातमी आली होती. अमेरिका व रशिया यांच्यामध्ये झालेल्या ‘स्टार्ट सामंजस्य करारा’त चीननेही सहभागी व्हावे अशी आग्रही भूमिका अमेरिकेने स्वीकारली आहे. त्याखेरीज अमेरिका या कराराचे पालन करणार नाही, असे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी बजावले होते. या पार्श्वभूमीवर अमेरिकेत नव्या अणु चाचणीसाठी हालचाली सुरू होणे महत्त्वाचे ठरते.

विविध आंतरराष्ट्रीय गट व संस्थांच्या माहितीनुसार, जगात आतापर्यंत दोन हजारांहून अधिक अणुचाचण्या करण्यात आल्या असून त्यापैकी हजारांहून जास्त चाचण्या अमेरिकेने केल्या आहेत. अमेरिकेव्यतिरिक्त सात देशांनी अणुचाचण्या केल्या असून त्यात रशिया, चीन, ब्रिटन, फ्रान्स, भारत, पाकिस्तान व उत्तर कोरियाचा समावेश आहे.

leave a reply