सौदीच्या ऑईल टर्मिनलवर हौथींचे ड्रोन हल्ले

- इंधन निर्यातीच्या सुरक्षेसाठी प्रत्युत्तर देण्याचा सौदीचा इशारा

सना/रियाध – सौदी अरेबियाचा संघर्षबंदीचा प्रस्ताव धुडकावणार्‍या येमेनमधील हौथी बंडखोरांनी सौदीच्या इंधन टर्मिनल तसेच लष्करी तळांवर जोरदार ड्रोन हल्ले चढविले. या हल्ल्यांमध्ये इंधनसाठा असलेल्या टँकने पेट घेतल्याची माहिती सौदीच्या सरकारने दिली. यामुळे खवळलेल्या सौदीने या ड्रोन व क्षेपणास्त्र हल्ल्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा दिला आहे.

चार दिवसांपूर्वी सौदीने येमेनमधील हौथी बंडखोरांना संघर्षबंदीचा प्रस्ताव दिला होता. या प्रस्तावासोबत सौदीने येमेनच्या हौदेदा बंदरावरील हल्ले रोखून येथील इंधनवाहतूक सुरू करण्याचे आश्‍वासन दिले होते. या इंधनाच्या निर्यातीतून मिळणारे उत्पन्न देखील हौथींना दिले जाईल, असे सौदीने म्हटले होते. पण या प्रस्तावात विशेष नसल्याचे सांगून हौथींनी सदर प्रस्ताव धुडकावून सौदीवरील हल्ले सुरू ठेवले होते.

तरी देखील सौदीने हौदेदा बंदरावरील बंदी मागे घेतली व गुरुवारी या बंदरावर या वर्षातील पहिले इंधनवाहू जहाज दाखल झाले होते. यामुळे हौथी बंडखोरांचे हल्ले थांबतील, असे बोलले जात होते. पण पुढच्या काही तासातच हौथी बंडखोरांनी सौदीच्या खमिस मुशैत आणि नजरान या दोन शहरांवर ड्रोन हल्ले चढविले. हौथींच्या या हल्ल्यांना यशस्वीरित्या भेदल्याचा दावा सौदीने केला होता. तसेच या हल्लेखोर ड्रोन्सचे सुटे भागही सौदीने माध्यमांसमोर मांडले होते.

मात्र यानंतरही हौथींनी सौदीवरील आपले हल्ले सुरू ठेवले. गुरुवारी रात्री सौदीच्या नैऋत्येकडील जिझान शहरातील ऑईल टर्मिनलवर हौथींनी ड्रोन हल्ले चढविले. या हल्ल्यामध्ये इंधनसाठा असलेल्या टँकने पेट घेतला व याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. गेल्या काही दिवसांपासून हौथींच्या हल्ल्यांवर बोलण्याचे टाळणार्‍या सौदीने या हल्ल्याची माहिती दिली. पण या हल्ल्यांसाठी थेट हौथींवर आरोप करण्याचे सौदीने टाळले.

इंधनसाठा व इंधननिर्यातीच्या सुरक्षेसाठी तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील इंधनवाहतुकीच्या स्वातंत्र्यासाठी सौदी या हल्ल्यांना सडेतोड प्रत्युत्तर देईल, असा इशारा सौदीने दिला. सौदीने हौथींचा उल्लेख टाळला असला तरी युएईने मात्र हौथींच्या या हल्ल्यांवर सडकून टीका केली. तर आखाती देशांच्या ‘जीसीसी’ने देखील सौदीच्या इंधनसाठ्यावरील हल्ल्यांसाठी हौथीच जबाबदार असल्याचा आरोप केला.

leave a reply