इस्रायलच्या मालवाहू जहाजावर इराणने क्षेपणास्त्र हल्ला चढविला

- इस्रायलच्या माध्यमांचा आरोप

जेरूसलेम – टांझानियातून भारताच्या मुंद्रा बंदराकडे निघालेल्या इस्रायलच्या मालवाहू जहाजावर गुरुवारी क्षेपणास्त्र हल्ला झाला. या क्षेपणास्त्र हल्ल्यात इस्रायली जहाजाचे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. या हल्ल्यात वापरले गेलेले क्षेपणास्त्र इराणी बनावटीचे होते, तसेच या हल्ल्यामागे इराण असल्याचा दावा इस्रायली माध्यमे करीत आहेत. दरम्यान, ओमानचे आखात आणि हिंदी महासागर क्षेत्रात इराण व इस्रायलमधील तणाव चिंताजनक स्थितीपर्यंत पोहोचल्याची चिंता इस्रायली विश्‍लेषक व्यक्त करीत आहेत. इस्रायलच्या हैफास्थित ‘एक्सटी मॅनेजमेंट लिमिटेड’ या कंपनीच्या मालकीचे ‘लोरी’ मालवाहू जहाज २१ मार्च रोजी टांझानियाच्या दार एस सलाम बंदरावरुन निघाले होते. गुरुवारी सकाळी सदर जहाज अरबी समुद्रात असताना यावर क्षेपणास्त्र हल्ला झाला. या हल्ल्यात जहाजाचे नुकसान झाले असून जीवितहानी टळल्याची माहिती इस्रायलच्या सुरक्षा यंत्रणेने दिली. या मालवाहू जहाजाने आपला प्रवास सुरू ठेवला असून लवकरच हे जहाज भारताच्या गुजरात राज्यातील मुंद्रा बेटावर दाखल होईल. तिथेच या जहाजाची दुरूस्ती केली जाईल.

सदर जहाजावरील या हल्ल्यात इराणी बनावटीच्या क्षेपणास्त्राचा वापर झाल्याचा आरोप इस्रायली वृत्तवाहिनीने केला. त्याचबरोबर या हल्ल्याचे स्वरुप पाहता, इराणने हा क्षेपणास्त्र हल्ला घडविल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे इस्रायली वृत्तवाहिनीचे म्हणणे आहे. इस्रायलमधील इतर माध्यमांनी देखील लोरी जहाजावरील हल्ल्यामागे इराण असल्याचा आरोप सुरू केला आहे. इस्रायलने अधिकृत स्तरावर इराणला थेट आरोप केलेला नाही. पण इस्रायली नागरिक व हितसंबंधाना लक्ष्य करण्यासाठी इराणचे प्रयत्न सुरू असल्याची प्रतिक्रिया इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांनी दिली.

बरोबर महिन्याभरापूर्वी ओमानच्या आखातात इस्रायलच्या ‘एमव्ही हेलियॉस रे’ या मालवाहू जहाजात संशयास्पद स्फोट झाला होता. इराणच या हल्ल्यासाठी जबाबदार असल्याचा आरोप इस्रायलने केला होता. यासाठी इस्रायलने २०१९ साली पर्शियन आखातात इतर व्यापारी व इंधनवाहू जहाजांवर झालेल्या हल्ल्यांची आठवण इस्रायलने करून दिली होती.

ओमानच्या आखातातील इस्रायली जहाजावर झालेल्या हल्ल्यानंतर भूमध्य समुद्राच्या क्षेत्रात इराणच्या मालवाहू जहाजावरील हल्ल्याची बातमीही प्रसिद्ध झाली होती. अमेरिकेच्या आघाडीच्या वर्तमानपत्राने या हल्ल्यासाठी इस्रायल जबाबदार असल्याचा आरोप केला होता. याशिवाय गेल्या दोन वर्षात इस्रायलने शस्त्रास्त्रे, इंधन व इतर साहित्य वाहून नेणार्‍या इराणच्या १२ जहाजांवर हल्ले केल्याचा दावा या वर्तमानपत्राने केला होता. यानंतर इराणने देखील इस्रायलच्या हल्ल्यांवर संताप व्यक्त करून लवकरच इस्रायलला प्रत्युत्तर दिले जाईल, अशी धमकी इराणच्या लष्करी अधिकार्‍यांनी दिली होती.

दरम्यान, गुरुवारी अरबी समुद्रात इस्रायलच्या जहाजावरील हल्ल्याची जबाबदारी इराणने स्वीकारलेली नाही. पण गेल्या काही आठवड्यांपासून ओमानचे आखात आणि अरबी समुद्रात इस्रायली व इराणी जहाजांवर होणार्‍या हल्ल्यांची तीव्रता पाहता, या दोन्ही देशांमधील तणाव चिंताजनक पातळीवर पोहोचल्याचे इस्रायली विश्‍लेषकाचे म्हणणे आहे.

leave a reply