अरब देशांपेक्षा हौथींकडे अधिक प्रभावी शस्त्रास्त्रे

- हौथी बंडखोर संघटनेचा दावा

सना – सौदी अरेबिया आणि अरब मित्रदेश येमेनमधली हौथी बंडखोरांबरोबर झालेल्या संघर्षबंदीचे पालन करीत आहे. पण या संघर्षबंदीच्या आड हौथी बंडखोर आपली शस्त्रसज्जता वाढवित असल्याचे समोर आले आहे. ‘पिस्तूले, कलाशनिकोव्ह रायफल्सपासून ते क्षेपणास्त्र, ड्रोन्सच्या निर्मितीपर्यंत, अशा सर्वप्रकारच्या शस्त्रनिर्मितीच्या तंत्रज्ञानाने हौथी अधिकाधिक सज्ज होत आहेत. अरब देशांकडेही नसतील, अशी शस्त्रास्त्रे आमच्याकडे आहेत’, असा दावा हौथी बंडखोर संघटनेच्या नेत्याने केला. तसेच सौदी व अरब देशांबरोबर नव्या संघर्षासाठी तयार रहावे, अशी चिथावणी या नेत्याने आपल्या सहकाऱ्यांना दिली.

अरब देशांपेक्षा हौथींकडे अधिक प्रभावी शस्त्रास्त्रे - हौथी बंडखोर संघटनेचा दावाइराणला आव्हान देण्यासाठी इस्रायल अरब देशांना शस्त्रसज्ज करीत असल्याच्या बातम्या येत आहेत. याआधी इस्रायलने युएई व बाहरिनला हवाई सुरक्षा यंत्रणा पुरविण्याचे संकेत दिले होते. इस्रायल व युएईमध्ये संरक्षण सहकार्याबाबत चर्चाही पार पडली होती. पण गेल्या आठवड्याभरात इस्रायली व अमेरिकी माध्यमांनी या संरक्षण सहकार्याबाबत नवे दावे केले आहेत. इस्रायल सौदी अरेबियासह इतर आखाती देशांना ‘लेझर डोम’ पुरविणार असल्याचे माध्यमांचे म्हणणे आहे. तीन महिन्यांपूर्वी इस्रायल व सौदीच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये या संदर्भात छुपी बैठक झाल्याचेही सांगितले जाते.

इस्रायल व अरब देशांची ही लष्करी आघाडी इराणविरोधात असल्याचा दावा केला जातो. अशा परिस्थितीत येमेनमधील ‘अन्सरुल्ला मुव्हमेंट’ अर्थात हौथी बंडखोरांच्या संघटनेने आपली शस्त्रसज्जता अरब देशांपेक्षाही भक्कम असल्याचा दावा केला. अरब देशांपेक्षा हौथींकडे अधिक प्रभावी शस्त्रास्त्रे - हौथी बंडखोर संघटनेचा दावासौदीच्या अतिदूर असलेल्या शहरांपर्यंत हल्ला चढवू शकणाऱ्या लांब पल्ल्याच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे आपल्याकडे असल्याचे हौथी बंडखोरांचे म्हणणे आहे. ही क्षेपणास्त्रे अमेरिकेची हवाई सुरक्षा यंत्रणा देखील भेदू शकत नसल्याचा दावा हौथी बंडखोरांच्या नेत्याने केला.

दरम्यान, सौदीमध्ये तैनात पॅट्रियॉट ही प्रगत हवाई सुरक्षा यंत्रणा हौथींचे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र हल्ले रोखण्यात अपयशी ठरल्याचे याआधी उघड झाले होते. शिवाय बायडेन प्रशासनाबरोबरील मतभेदांमुळे सौदीला अमेरिकेकडून शस्त्रास्त्रे मिळण्यात अडथळे येत होते. अरब देशांपेक्षा हौथींकडे अधिक प्रभावी शस्त्रास्त्रे - हौथी बंडखोर संघटनेचा दावायामुळे हौथी बंडखोरांपासून सौदीला असलेला धोका अधिकच वाढला होता. अशा परिस्थितीत इस्रायलने सौदीला देऊ केलेले लष्करी सहाय्य अतिशय महत्त्वाचे ठरते. हौथी बंडखोरांच्या शस्त्रसज्जतेमागे इराणचा हात असल्याचे वेळोवेळी उघड झाले होते. आता सौदी अरेबिया या येमेनी बंडखोरांच्या विरोधात इस्रायलचे सहकार्य घेऊन आपली सुरक्षा निश्चित करीत असल्याचे दिसू लागले आहे.

सौदी-इस्रायलमध्ये विकसित होत असलेल्या या लष्करी सहकार्याचे फार मोठे सामरिक व राजकीय परिणाम आखाती क्षेत्रात पहायला मिळतील. याची जाणीव झालेल्या लेबेनॉनमधील हिजबुल्लाह व पॅलेस्टाईनमधील हमास या संघटनांना झालेली आहे. काही दिवसांपूर्वीच इराणशी जवळीक असलेल्या या दोन्ही संघटनांनी अरब-आखाती देशांना इस्रायलबरोबरील लष्करी सहकार्याविरोधात गंभीर इशारे दिले होते.

leave a reply