हजारो टन धान्य नेणारे रशियाचे जहाज ताब्यात घ्या

- युक्रेनची तुर्कीकडे मागणी

किव्ह – युक्रेन युद्धामुळे जगभरात अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली आहे. पाश्चिमात्य देश यासाठी रशियाला जबाबदार धरले होते. पण अमेरिका व युरोपिय देशांचे निर्बंधच अन्नधान्याच्या पुरवठ्यात अडथळा निर्माण करीत असल्याचा आरोप रशियाने केला होता. यानंतर रशियाने सुमारे सात हजार टन इतके कडधान्याने भरलेले जहाज गरजू देशांसाठी रवाना केले आहे. मात्र बेकायदेशीररित्या धान्याची वाहतूक करणारे हे रशियन जहाज तुर्कीने ताब्यात घ्यावे, अशी मागणी युक्रेनने केली आहे.

हजारो टन धान्य नेणारे रशियाचे जहाज ताब्यात घ्या - युक्रेनची तुर्कीकडे मागणी‘झिबेक झॉली’ हे जहाज काही दिवसांपूर्वी युक्रेनच्या बर्डियान्स्क बंदरातून हजारो टन कडधान्य घेऊन निघाले होते. कझाकस्तानच्या ‘केटीझेड एक्स्प्रेस’ची मालकी असलेल्या या जहाजाची वाहतूक रशियाच्या ‘ग्रीन लाईन’ या कंपनीने हाती घेतली आहे. पाश्चिमात्य देशांनी रशियन नेते, अधिकारी आणि कंपन्यांवर निर्बंध लादले आहेत. पण यामध्ये ग्रीन लाईनचा समावेश नाही. त्यामुळे रशियाची ही मालवाहतूक निर्बंधांच्या आड येत नाही.

मात्र रशियाच्या घुसखोर लष्कराने आमचे कडधान्य चोरल्याचा आणि त्याची बेकायदेशीररित्या निर्यात करीत असल्याचा ठपका युक्रेनने ठेवला आहे. रशियाने युक्रेनचे हे आरोप फेटाळले होते. पण तुर्कीतील युक्रेनचे राजदूत वॅसिली बोद्नार यांनी सदर रशियन जहाजावर कारवाई करून सदर जहाज ताब्यात घ्यावे, अशी मागणी केली आहे. तुर्कीने यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. पण सदर जहाज तुर्कीच्या करासू बंदरात दाखल झाले आहे.

दरम्यान, तुर्कीने रशियाविरोधात भूमिका घ्यावी, यासाठी अमेरिका व पाश्चिमात्य देशांकडून दबाव टाकला जात आहे. अमेरिकेच्या या दबावानंतर तुर्कीने स्वीडन व फिनलँडच्या नाटोतील सहभागाला मान्यता दिली. या मोबदल्यात अमेरिका तुर्कीला लष्करी सहाय्य पुरविणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. पण यामुळे रशिया नाराज झाल्याचा दावा पाश्चिमात्य माध्यमे करीत आहेत.

leave a reply