‘हल’ पुढील तीन वर्षात १५० ‘एलसीएच’ पुरविणार

- ‘तेजस मार्क-१ए’चाही पुरवठा सुरू होणार

‘हल’नवी दिल्ली – शुक्रवारी झाशीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय बनावटीचे लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर (एलसीएच) वायुसेनेला सोपविले होते. ‘हिंदूस्तान एरोनॉटिकल लिमिटेड-हल’चे अध्यक्ष ए.आर.माधवन यांनी प्रत्येक वर्षाला ५० हेलिकॉप्टर्स तयार करण्याची क्षमता कंपनीकडे असल्याचे म्हटले आहे. यानुसार २०२४ सालापर्यंत दीडशे ‘एलसीएच’ हेलिकॉप्टर वायुसेनेला पुरवठ्याची क्षमता हलकडे आहे. याशिवाय तेजस मार्क-१ या लढाऊ विमानाची अद्ययावत आवृत्ती असलेल्या ‘तेजस मार्क-१ए’ या विमानांचा पुरवठाही २०२४ सालापासून हलकडून सुरू होईल, असेही माधवन यांनी जाहीर केले. हलला ७३ ‘तेजस मार्क-१ए’ विमानांची ऑर्डर मिळाल्याची माहिती माधवन यांनी यावेळी दिली.

१९९९ सालच्या कारगिल युद्धानंतर भारताला अतिउंचीवर उड्डाण व लॅण्डिंग करू शकतील व क्षेपणास्त्र ही डागू शकतील अशा हेलिकॉप्टर्सची आवश्यकता भासली. यातूनच ‘लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर-एलसीएच’ विकसित करण्याचा प्रकल्प आकाराला होता. हल आणि भारतीय संरक्षणदलांनी यादृष्टीने प्रयत्न सुरू केले व २०१० साली ‘एलसीएच’चा प्रोटोटाईपने उड्डाण घेतले. सियाचीनसारख्या जगातील सर्वात उंचावरील युद्धभूमीपासून हिमालयीत क्षेत्रात ‘एलसीएच’ चार प्रोटाटाईपच्या अनेक चाचण्या पार पडल्या.

हे हेलिकॉप्टर १६ हजार फुट उंचीवर उड्डाण व लॅण्डिंग करू शकणारे जगातील एकमेव लढाऊ हेलिकॉप्टर आहे. या हेलिकॉप्टर्सवर अत्याधुनिक तंत्रज्ञानानी सज्ज आहे. दुहेरी इंजिन असलेले हे हेलिकॉप्टर डायरेक्शनल इन्फ्रारेड काउंटर मेजर (डीआरआयसीएम), हवेतून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र (एटीजीएम), ऍन्टी रेडीएशन क्षेपणास्त्र (एआरएम), तसेच बॉम्ब, आण्विक, जैविक आणि रासायनिक (एनबीसी) संरक्षण यंत्रणाही या हेलिकॉप्टरमध्ये आहे. या हेलिकॉप्टरचे वजन आणि क्षमता निर्यातीला मोठा वाव असल्याचा दावा केला जात आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते औपचारीकरित्या हे हेलिकॉप्टर वायुसेनेत दाखल करून घेतल्याच्या पार्श्‍वभूमीवर हलचे अध्यक्ष ए. आर. माधवन यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

१५ ‘एलसीएच’ हेलिकॉप्टर्सची ऑर्डर आधीच वायुसेनेला मिळाली आहे. यातील तीन हेलिकॉप्टर्स तयार आहेत. उर्वरीत हेलिकॉप्टर्सची ऑर्डर ही वर्षभराच्या आत पूर्ण केली जाईल. तसेच लष्कर व वायुसेनेकडून १५० हेलिकॉप्टर्सची ऑर्डर्स मिळण्याची क्षक्यता आहे. त्याचा विचार करून हल आपली उत्पादन क्षमता वाढवित आहे. वर्षाला ५० हेलिकॉप्टर्सचे उत्पादन घेऊन ती पुरविण्याची क्षमता हलकडे आहे. यानुसार २०२४ सालापर्यंत दीडशे ‘एलसीएच’ हेलिकॉप्टर्सचा हल पुरवठा करू शकेल, असे माधवन यांनी म्हटले आहे.

तसेच वायुसेनेकडून ‘तेजस मार्क-१ए’ या तेजसच्या अत्याधुनिक आवृत्तीचा पुरवठाही २०२४ सालापासून सुरू होईल, अशी माहिती माधवन यांनी दिली. ७३ ‘तेजस मार्क-१ए’ची मागणी नोंदविण्यात आली आहे. याआधी हलकडे मार्क-१ आवृत्तीच्या १२३ विमानांची ऑर्डर आली आहे. या व्यतिरिक्त ही ७३ ‘तेजस मार्क-१ए’ची ऑर्डर असल्याची माहिती माधवन यांनी दिली.

leave a reply