अमेरिकेच्या दबावानंतर युएईतील चीनच्या लष्करी हालचाली थांबल्या

लष्करी हालचालीवॉशिंग्टन – परदेशातील व्यापारी बंदरांचा वापर आपल्या लष्करी महत्त्वाकांक्षेसाठी करणार्‍या चीनचा पर्दाफाश झाला आहे. युएईच्या बंदरात अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करणारा चीन या ठिकाणी लष्करी हालचाली करीत असल्याचे अमेरिकेने युएईच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर चीनला युएईच्या बंदरावरील आपल्या लष्करी हालचाली थांबवाव्या लागल्याची बातमी अमेरिकेच्या वर्तमानपत्राने प्रसिद्ध केली आहे.

आपल्या आर्थिक बळाचा वापर करून चीन जगभरात सुमारे नव्वदहून अधिक व्यावसायिक बंदरांवर नियंत्रण ठेवून आहे. यापैकी सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या ठरणार्‍या काही बंदरांचा वापर चीन आपल्या लष्करी महत्त्वाकांक्षांसाठी करीत असल्याची बाब उघड झाली होती. यानंतर डेन्मार्क, बांगलादेश व मालदीव या देशांनी चीनला दिलेल्या आपल्या बंदरांबाबतचा करार मोडीत काढला होता. यानंतर आता युएईसारख्या आखाती देशाचे बंदरही चीन लष्करी हालचालींसाठी वापरत असल्याची बाब समोर आल्यानंतर, चीनचा नव्याने पर्दाफाश झाला आहे.

लष्करी हालचालीचीनच्या ‘कॉस्को’ या शिपिंग कंपनीने चार वर्षांपूर्वी युएईच्या खलिफा बंदरात अएक अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली होती. व्यापारासाठी या बंदराचा वापर करण्याचे चीनने म्हटले होते. पण काही महिन्यांपूर्वी अमेरिकेच्या सॅटेलाईटने टिपलेल्या फोटोग्राफ्समध्ये सदर बंदरात चीनने मोठ्या लष्करी हालचाली सुरू केल्या आहेत. याचा सुगावा लागू नये यासाठी चीनने या भागात मातीचे मोठे ढिगारे उभे केले आहेत. अमेरिकेने ही सर्व माहिती युएईला पुरविली तसेच त्यावरील आपली नाराजीही व्यक्त केल्याचा दावा अमेरिकी वर्तमानपत्राने केला. खलिफा बंदरापासून काही अंतरावरच युएईतील अमेरिकेचा लष्करी तळ आहे. खलिफा बंदरातील चीनच्या लष्करी हालचाली अमेरिकेसाठी त्याचबरोबर पर्शियन आखातातील व्यापारी जहाजांच्या वाहतुकीवर परिणाम करणार्‍या ठरतील, असे अमेरिकेने बजावले. त्याचबरोबर युएईने चीनच्या लष्करी हालचाली रोखल्या नाही तर अमेरिकेकडून मिळणारे सहाय्य रोखण्याचा इशाराही दिला होता, असे अमेरिकी वर्तमानपत्राने म्हटले आहे.

यानंतर युएईने खलिफा बंदरातील चीनला बांधकाम बंद पाडण्यास भाग पाडले. सध्या खलिफा बंदरावर चिनी अधिकारी आहेत का, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. अमेरिकी वर्तमानपत्राच्या या बातमीवर चीनने प्रतिक्रिया दिलेली नाही. अमेरिकेतील युएईच्या दूतावासाने देखील यावर बोलण्याचे टाळले. मात्र यामुळे चीनची विश्‍वासार्हता अधिकच धोक्यात आली आहे. याआधीही चीनने अशा प्रकारच्या कारवाया करून आपल्याशी सहकार्य करणार्‍या देशांचा विश्‍वासघात केल्याची उदाहरणे समोर आलेली आहेत.

leave a reply