‘अम्फान’ चक्रीवादळाची भीषणता वाढली

- पश्चिम बंगाल आणि ओडिशाला धोका

नवी दिल्ली – बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्यामुळे तयार झालेल्या ‘अम्फान’ चक्रीवादळाची भीषणता अधीकच वाढली आहे. सुमारे २०० किलोमीटर वेगाने हे वादळ पश्चिम बंगालच्या किनारपट्टीच्या दिशेने सरकत आहे. प्रचंड ताकतीच्या या वादळामुळे ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टी भागात मोठे नुकसान होऊ शकते, असा इशारा हवामानखात्याने दिला आहे. २१ वर्षानंतर बंगालच्या उपसागरात एवढे मोठे चक्रीवादळ निर्माण झाले आहे. चक्रीवादळामुळे सुमारे ११ लाख नागरिकांना फटका बसण्याचा धोका असून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तयारीचा सखोल आढावा घेतला.

पश्चिम बंगालमध्ये ‘अम्फान’ वादळाबाबत अलर्ट देण्यात आला असून बुधवारी दुपारपर्यंत हे वादळ पश्चिम बंगालच्या किनारपट्टीला धडकेल, असा इशारा देण्यात आला आहे. चक्रीवादळ उत्तर-पूर्व दिशेच्या दिशेने सरकत २० मे च्या दुपारपर्यंत हे वादळ दिघाहटिया बेट पार करेल. या दरम्यान या चक्रीवादळाचा वेग १८५ किमी प्रती तासापर्यंत असू शकतो, असा अंदाज वर्तविण्यात येतो.

‘अम्फान’ चक्रीवादळ भारतीय किनारपट्टीच्या दिशेने सरकत असताना पश्चिम बंगालमधील अनेक जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. चक्रीवादळाने भीषण बनल्याने ओडिशाच्याही किनारपट्टी भागात जोरदार वाऱ्यासह पाऊस पडेल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या इशाऱ्यानंतर राज्य सरकारने या भागातून ११ लाख नागरिकांना सुराक्षित स्थळी हलवण्याची तयारी सुरू केली आहे. ओडिशा सरकारने १२ जिल्ह्यांमध्ये अलर्ट घोषित केला असून बालासोर, भद्रक, जाजपूर, मयूरभंज जिल्हे मोठ्या प्रमाणात प्रभावित होऊ शकतात.

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी सर्व परिस्थितीचा सखोल आढावा घेतला. तसेच राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाने (एनडीआरएफ) नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी तयार केलेल्या योजनेचा आढावा घेतला. पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये ‘एनडीआरएफ’च्या २५ पथकांना तैनात करण्यात आले आहे, तर इतर १२ पथक राखीव ठेवण्यात आली आहेत. देशातील वेगवेगळ्या भागातील एनडीआरएफची २४ पथके आपत्कालीन परिस्थितीशी सामना करण्यास तयार असल्याचे एनडीआरएफचे महासंचालकांनी सांगितले. चक्रीवादळामुळे वीजपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यासह रेल्वेला देखील फटका बसण्याची शक्यता असून पिकांचे देखील नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जाते.

दरम्यान, १९९९ साली बंगालच्या उपसागर निर्माण झालेल्या चक्रीवादळाने प्रचंड नुकसान केले होते. ओडिशा, पश्चिम बंगालमध्ये सुमारे नऊ हजार जणांचा बळी गेला होता. अशी जीवित हानी पुन्हा होऊ नये म्हणून प्रशासनाने कंबर कसली आहे.

leave a reply