कोरोनाव्हायरसच्या जगभरातील रुग्णांची संख्या ४८ लाखांवर

बाल्टिमोर – कोरोनाव्हायरसमुळे गेल्या २४ तासात जगभरात साडेतीन हजार जण दगावले असून या साथीच्या ८२,२४७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. सोमवारी संध्याकाळपर्यंत जगभरातील या साथीच्या रुग्णांची एकूण संख्या ४८ लाखांच्या पुढे गेली. तर १८,६८,५३२ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

कोरोनाव्हायरसमुळे जगभरात दगावलेल्यांच्या संख्येत मोठी घट झाल्याचा दावा ‘जॉन हॉपकिन्स विद्यापीठा’ने केला आहे. या साथीने जगभरात ३,१७,१७४ जणांचा बळी गेला असून यामध्ये गेल्या चोवीस तासातील ३६१७ बळींचा समावेश आहे. गेल्या चोवीस तासात अमेरिकेत ८२०, युरोपिय देशांमध्ये १,५१८ आणि ब्राझिलमध्ये ७४९ जण दगावले आहेत.

अमेरिकेत कोरोनाने दगावलेल्यांची संख्या ९० हजारांच्या वर गेली आहे. तर गेल्या चोवीस तासात अमेरिकेत कोरोनाचे वीस हजाराहून अधिक रुग्ण आढळले असून या देशातील साथीच्या एकूण रुग्णांची संख्या आता पंधरा लाखाच्या पुढे आहे. अमेरिकेतील कोरोनाचे रुग्ण आणि बळींची संख्या घटत आहे, यावर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाधान व्यक्त केले.

गेल्या चोवीस तासात युरोपमध्ये १६,७०० कोरोनाचे नवे रुग्ण आढळले असून येथील या साथीच्या एकूण रुग्णांची संख्या १८ लाखांच्या जवळ पोहोचली आहे. अमेरिका आणि युरोपमध्ये साथीच्या रुग्णांची संख्या घटत असताना ब्राझिलमध्ये मात्र या साथीचा उद्रेक झाल्याचे दिसत आहे. गेल्या चोवीस तासात ब्राझिलमध्ये कोरोनाचे १३,२२० रुग्ण आढळले असून या देशातील कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या २,४१,०८० वर गेली आहे.

दरम्यान, चीन आणि दक्षिण कोरियामध्ये या साथीचे दुसरी लाट आली असून दररोज या देशांमध्ये कोरोनाचे नवे रुग्ण आढळत आहेत. सोमवारी दक्षिण कोरियामध्ये १५ तर चीनमध्ये सात नवे रुग्ण आढळल्याचे सांगितले जाते.

leave a reply