आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाचे पथक युक्रेनमधील अणुप्रकल्पासाठी रवाना

- रशियाकडून स्वागत

आंतरराष्ट्रीय अणुऊर्जाव्हिएन्ना/मॉस्को – युक्रेनच्या झॅपोरिझिआ प्रकल्पावर होणाऱ्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाचे पथक प्रकल्पाच्या पाहणीसाठी रवाना झाले आहे. अणुऊर्जा आयोगाचे प्रमुख रफाएल ग्रॉसी यांनी ट्विट करून याची माहिती दिली. आयोगाच्या निर्णयाचे रशियाने स्वागत केले असून या भेटीमुळे प्रकल्पाबाबत असणारे सर्व गैरसमज दूत होतील, असा विश्वास रशियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. दरम्यान, या भेटीपूर्वीही प्रकल्पाच्या परिसरातील हल्ले सुरू असून रशियाने युक्रेनचे एक ड्रोन पाडल्याचा दावा केला आहे.

फेब्रुवारी महिन्यात युक्रेनवर चढविलेल्या हल्ल्यानंतर काही आठवड्यांमध्ये रशियाने युक्रेनमधील झॅपोरिझिआ अणुप्रकल्पावर ताबा मिळविला होता. युक्रेनमधील हा अणुऊर्जाप्रकल्प युरोपातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पांपैकी एक आहे. याची क्षमता तब्बल सहा हजार मेगावॅट इतकी आहे. या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात संवर्धित युरेनियम तसेच अणुइंधनाचा साठा आहे. सध्या या प्रकल्पात युक्रेनी कंपनीचे कर्मचारी कार्यरत आहेत.

आंतरराष्ट्रीय अणुऊर्जायुक्रेनने गेल्या महिन्यात दक्षिण युक्रेनमध्ये रशियाच्या ताब्यात असणाऱ्या भागांवर प्रतिहल्ले सुरू केले होते. या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये हा प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेत आला होता. वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे प्रकल्पासह संपूर्ण युरोप खंडाची सुरक्षा धोक्यात आल्याचे इशारे देण्यात आले होते. रशिया व युक्रेन या दोन्ही देशांनी हल्ल्यांसाठी परस्परांवर आरोप-प्रत्यारोप सुरू केले होते. या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय समुदायाने तीव्र चिंता व्यक्त करून प्रकल्पाच्या निरीक्षणाची परवानगी मागितली होती.

आंतरराष्ट्रीय अणुऊर्जारशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी दिलेल्या परवानगीनंतर आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाने प्रकल्पाच्या पाहणीबाबत रशियाशी करार झाल्याचेही जाहीर केले होते. त्यानंतर काही दिवसातच आयोगाने तज्ज्ञांचे पथक सज्ज केले आहे. पथकाचे नेतृत्व आयोगाचे प्रमुख रफाएल ग्रॉसी स्वतः करणार असल्याने त्याकडे विशेष लक्ष वेधले गेले आहे. ग्रॉसी यांनी आयोगाच्या पथकाचा फोटोग्राफ सोशल मीडियावर प्र्रसिद्ध केला आहे. त्याचबरोबर पुढील काही दिवसात आपण झॅपोरिझिआ प्रकल्पात असू, असा विश्वासही व्यक्त केला. रशियाने या घोषणेचे स्वागत केले. आयोगाच्या भेटीमुळे प्र्रकल्पाच्या दुरावस्थेबाबत असलेले सर्व गैरसमज दूर होतील, अशी ग्वाही वरिष्ठ अधिकारी मिखाईल उलियानोव्ह यांनी दिली. आयोगाची भेट शक्य व्हावी म्हणून रशियाने सर्व काळजी घेतली असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याचवेळी या भेटीनंतर आयोग आपले काही तज्ज्ञ कायमस्वरुपी प्रकल्पात तैनात करण्यासंदर्भात प्र्रस्ताव असल्याची रशियाला कल्पना आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, आयोगाचे पथक दाखल होत असतानाही प्रकल्पाच्या भागात हल्ले चालू असल्याची माहिती समोर येत आहे. रशियाने प्रकल्पावरील हल्ल्यासाठी आलेले युक्रेनचे एक ड्रोन पाडल्याचा दावा केला.

leave a reply