रशियावर टाकलेल्या निर्बंधांमुळे युरोपला मोठ्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल

मोठ्या आव्हानांना तोंडब्रुसेल्स – रशियावर निर्बंध टाकून त्या देशाच्या आर्थिक संधींवर मर्यादा घातल्या असल्या तरी त्याचवेळी युरोपिय महासंघाला मोठ्या आव्हानांना तोंड द्यावे लागत असल्याची कबुली महासंघाचे परराष्ट्र प्रमुख जोसेप बॉरेल यांनी दिली. बॉरेल यांच्या कबुलीपूर्वी जगातील आघाडीचे मासिक असणाऱ्या ‘द इकॉनॉनिस्ट’नेही रशियावर पाश्चिमात्य देशांनी लादलेले निर्बंध अपयशी ठरल्याचे म्हटले आहे. सुरुवातीच्या धक्क्यांनंतर रशियन अर्थव्यवस्था पुन्हा एकदा स्थिर होण्यास सुरुवात झाली असून इंधनाच्या विक्रीतूनही रशियाला तब्बल 265 अब्ज डॉलर्सचा महसूल मिळणार असल्याची माहिती ब्रिटीश मासिकाने दिली आहे.

रशिया-युक्रेन युद्धाला सुरुवात झाल्यानंतर रशियावर निर्बंध टाकण्यासाठी अमेरिका व युरोपिय देशांनी पुढाकार घेतला होता. सुरुवातीच्या काळात या निर्बंधांमुळे रशियन अर्थव्यवस्थेला मोठे धक्के बसले होते. अमेरिकेने रशियन अर्थव्यवस्थेचा कणा मोडण्याच्या वल्गनाही केल्या होत्या. पण गेल्या काही दिवसात निर्बंध लादणाऱ्या पाश्चिमात्य देशांनाच त्याचे मोठे फटके बसण्यास सुरुवात झाल्याचे दिसत आहे. महासंघाचे परराष्ट्र प्रमुख बॉरेल यांनी दिलेली कबुली त्याचाच भाग दिसत आहे.

मोठ्या आव्हानांना तोंड

युक्रेनला पुढे करून अमेरिका व नाटोने रशियाच्या विरोधात पुकारलेले युद्ध अपेक्षित मार्गाने पुढे गेले नाही. नाटोत सहभागी होण्यासाठी तयार झालेल्या युक्रेनला धडा शिकविण्यासाठी रशिया लष्करी कारवाई करील, इथवर ही योजना यशस्वी ठरली. मात्र या युद्धाचे दारूण परिणाम रशियन अर्थव्यवस्थेवर होतील, हा अंदाज अजिबात खरा ठरलेला नाही. उलट रशियन अर्थव्यवस्था या युद्धामुळे अधिकाधिक भक्कम बनत चालली असून रशियाच्या इंधन निर्यातीला लक्ष्य करण्याची धोरणेही युरोप व अमेरिकेवरच उलटल्याचे दिसत आहे.

जगासमोर फार मोठे आर्थिक संकट खडे ठाकलेले असताना, युक्रेनच्या युद्ध आणि रशियाच्या इंधनावरील निर्बंधाचे भीषण परिणाम प्रमुख देशांच्या अर्थव्यवस्थांवरही होत आहेत. याची कबुली बॉरेल यांनी दिली. पाश्चिमात्यांच्या हातात असलेले निर्बंधांचे हत्यार आत्तापर्यंत सर्वात प्रभावी मानले जात होते. पण युक्रेनच्या युद्धाने हे निर्बंधांचे हत्यार बोथट झाल्याची जाणीव करून दिलेली आहे, अशा मर्मभेदी शब्दात एका नियतकालिकाने पाश्चिमात्य देशांना त्यांच्या मर्यादेची जाणीव करून दिलेली आहे.

leave a reply