हिजबुल्लाहने इस्रायलवर हल्ला केला तर लेबेनॉनला किंमत चुकवावी लागेल

- इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांचा इशारा

जेरूसलेम – ‘हिजबुल्लाह हीच आपल्यावरील संकटाचे मूळ कारण आहे, इस्रायल नाही, हे लेबेनीज जनतेने लवकर ओळखले तर चांगले होईल. कारण येत्या काळात हिजबुल्लाहने इस्रायलवर हल्ला चढविला तर त्यासाठी लेबेनॉनला किंमत चुकवावी लागेल. लेबेनॉनवर अशी वेळ येऊ नये, अशीच माझी अपेक्षा आहे. पण असे झालेच तर लेबेनॉनवरील कारवाईसाठी इस्रायल पूर्ण सज्ज आहे’, असा इशारा इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांनी दिला. ४ ऑगस्ट रोजी लेबेनॉनची राजधानी बैरूतमध्ये झालेल्या शक्तीशाली स्फोटानंतर, लेबेनीज जनतेमध्ये हिजबुल्लाहच्या विरोधात असंतोष खदखदत आहे. या पार्श्वभूमीवर इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी लेबेनीज जनतेला हिजबुल्लाहपासून असलेल्या धोक्याची जाणीव करुन दिली.

इस्रायलवर हल्ला

गेल्या काही दिवसांपासून इस्रायली लष्कराने उत्तरेकडील सीमेजवळ ‘लिथल अ‍ॅरो’ हा मोठा युद्धसराव सुरू केला आहे. लेबेनॉन, सिरिया, गाझापट्टी किंवा इतर कुठल्याही भागातून हिजबुल्लाह, हमास आणि इराणसंलग्न दहशतवादी संघटनांविरोधी कारवाईचा यात सराव केला जात आहे. एका दिवसात इस्रायली लष्कर वेगवेगळ्या ठिकाणी किती हल्ले चढवू शकेल, याचा अभ्यास युद्धसरावादरम्यान केला गेला. या युद्धसरावात इस्रायली लष्कराबरोबरच राखीव दलाच्या जवानांनीही सहभाग घेतला होता. हिजबुल्लाहच्या विरोधातील युद्धसरावाचा यात समावेश होता. त्याचबरोबर इस्रायलच्या सीमेला खेटून नसणार्‍या देशांमध्ये इराणसंलग्न दहशतवाद्यांवर हल्ले चढविण्याचा सरावही करण्यात आला. इस्रायली लष्कराने उल्लेख केला नसला तरी इराकमधील इराणसंलग्न दहशतवादी गटांवर हल्ल्याची तयारी इस्रायलने केल्याचे दिसत आहे.

या युद्धसरावाची पाहणी केल्यानंतर संरक्षणमंत्री गांत्झ यांनी लेबेनीज जनतेला बजावले. लेबेनॉनमधील काही गट इस्रायलबरोबर शांती प्रस्थापित करण्यासाठी उत्सुक असून इस्रायल या प्रयत्‍नांचे स्वागत करीत आहे. पण हे प्रयत्‍न सुरू असताना इस्रायली लष्कर हिजबुल्लाहपासून आपल्या सीमेच्या सुरक्षेसाठी सज्ज असल्याचा इशारा संरक्षणमंत्री गांत्झ यांनी दिला. त्याचबरोबर इस्रायलच्या संरक्षणदलांनी वर्षाचे ३६५ दिवस प्रत्येक आघाडीवर देशाची सुरक्षितता निश्चित केली पाहिजे, असेही गांत्झ म्हणाले. इस्रायलचे शत्रू दररोज हल्ल्याची तयारी करीत असून इस्रायली लष्करानेही कोणत्याही युद्धासाठी सज्ज रहावे, असे आदेश गांत्झ यांनी दिले. याआधी जुलै महिन्यात देखील संरक्षणमंत्री गांत्झ यांनी हिजबुल्लाहला इशारा दिला होता. हिजबुल्लाहच्या हल्ल्यात इस्रायली नागरिक किंवा जवान जखमी झाला तर दक्षिण लेबेनॉनमधील हिजबुल्लाहचा शस्त्रसाठा नष्ट करण्याचे आदेश गांत्झ यांनी दिले होते.

इस्रायलवर हल्ला

दरम्यान, हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांनी लेबेनॉनच्या दक्षिणेकडे, इस्रायलच्या सीमेजवळ मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रांची जमवाजमव केल्याचा आरोप इस्रायल करीत आहे. हिजबुल्लाहने इराणच्या सहाय्याने किमान सव्वा लाखाहून अधिक रॉकेट्स, क्षेपणास्त्रे या ठिकाणी तैनात केल्याचा दावा इस्रायली लष्कर करीत आहे. सीमेजवळील सुमारे २०० गावांमध्ये खंदके व बोगदे खोदून हिजबुल्लाहने हा साठा केल्याचे इस्रायली लष्कराचे म्हणणे आहे.

leave a reply