कर्जमर्यादा न वाढविल्यास अमेरिका ‘डिफॉल्टर’ होऊ शकेल

अर्थमंत्री जॅनेट येलेन यांचा इशारा

yellen-tells-congressवॉशिंग्टन – येत्या काही दिवसात कर्जावरील मर्यादा उठविण्यात अपयश आल्यास अमेरिकी अर्थव्यवस्था ‘डिफॉल्टर’ होऊ शकते, असा इशारा अर्थमंत्री जॅनेट येलेन यांनी दिला. 2021 साली संसदेने 31.4 ट्रिलियन डॉलर्सची कर्जमर्यादा निश्चित केली होती. ही मर्यादा 19 जानेवारी रोजी संपत असून त्यानंतर कोषागार विभागाला काही असाधारण उपापयोजना लागू करणे भाग पडेल, याकडे अर्थमंत्री येलेन यांनी लक्ष वेधले. अमेरिकेची अर्थव्यवस्था मंदीच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे इशारे गेल्या काही महिन्यांमध्ये सातत्याने देण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्था ‘डिफॉल्ट’ होण्याबाबत दिलेला इशारा लक्ष वेधून घेणारा ठरतो.

us defaultअर्थमंत्री येलेन यांनी अमेरिकी संसदेला उद्देशून पत्र लिहिले असून त्यात अमेरिकी अर्थव्यवस्था ‘डिफॉल्ट’ होण्याच्या धोक्याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. ‘19 जानेवारी रोजी कर्जमर्यादा गाठल्यानंतर बायडेन प्रशासनाला नवे कर्ज उभारता येणार नाही. अशा परिस्थितीत वेगवेगळ्या उपाययोजना करून खर्चावर नियंत्रण ठेवण्यात येईल. मात्र या उपाययोजना फारतर जून महिन्यापर्यंत चालू राहू शकतील. त्यानंतर प्रशासनाला देणी चुकविणे भाग पडेल व तसे न झाल्यास अर्थव्यवस्थेवर कर्ज बुडविणारी अर्थव्यवस्था म्हणून शिक्का बसेल’, याची गंभीर जाणीव अर्थमंत्र्यांनी पत्राद्वारे करून दिली.

कर्जाची देणी बुडित जाण्याचा धोका अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम घडविणारा ठरु शकतो, असा इशाराही अर्थमंत्री येलेन यांनी दिला आहे. अर्थमंत्री येलेन यांचा पत्रावर व्हाईट हाऊसने प्रतिक्रिया दिली असून संसदेत लवकरच विधेयक मांडण्यात येईल, असे म्हटले आहे. मात्र कर्जमर्यादा वाढविण्याच्या विधेयकावरून संसदेत जबरदस्त राजकीय संघर्ष होण्याची शक्यता माध्यमांनी वर्तविली आहे.
कर्जावरील मर्यादा वाढवायची असेल तर त्याचबरोबर खर्चावरही मर्यादा घालावी लागेल, असा इशारा रिपब्लिकन पार्टीने दिला आहे. प्रशासनाकडून होणाऱ्या खर्चात आम्ही बदल घडवू, असा इशारा प्रतिनिधीगृहाचे सभापती केव्हिन मॅकार्थी यांनी दिला. असे झाल्यास राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या अजेंड्याचा भाग असणाऱ्या काही योजना अडचणीत येऊ शकतात. त्यामुळे डेमोक्रॅट पक्षाने याला जोरदार विरोध दर्शविला आहे.

leave a reply