तिबेटचा प्रश्न सुटला तर भारत-चीन सीमावाद आपोआप सुटेल

तिबेटींच्या निर्वासित सरकारच्या प्रमुखांचा दावा

नवी दिल्ली/ धरमशाला, – तिबेटचा प्रश्न सुटला तर भारत-चीन सीमावाद आपोआप सुटेल, असा दावा भारतातील निर्वासित तिबेटियन सरकारचे प्रमुख डॉ. लॉबसांग सांगेय यांनी केला आहे. जोपर्यंत तिबेटवर चीनने कब्जा केला नव्हता, तोपर्यंत इथल्या सीमेवर भारताला लष्कर तैनात करण्याचीही आवश्यकता भासली नव्हती, याची आठवण डॉ. सांगेय यांनी करून दिली. अमेरिकन संसदेत तिबेटच्या स्वातंत्र्याची मागणी करणारे विधेयक सादर झालेले असताना तिबेटचा प्रश्न भारत-चीन सीमावादाशी जोडून डॉ. सांगेय यांनी फार मोठी मुत्सद्देगिरी दाखविल्याचे दिसत आहे.  CTA President Dr Lobsang Sangay

लडाखच्या गलवान नदी आणि पँगोंग सरोवर क्षेत्रात भारत आणि चीनचे जवान एकमेकांसमोर खडे ठाकले आहेत. गेली २० दिवस या भागात प्रचंड तणाव आहे आणि दोन्ही देशांकडून सैन्य तैनाती वाढविण्यात आली आहे. चीन सीमेवर लढाऊ विमानांची उड्डाणे करून भारताला युद्धाचे इशारे देत आहे. मात्र भारताने चीनला जशास तसे उत्तर देण्याची पूर्ण तयारी केली असून यामुळे भारतावर दडपण वाढविण्याचा प्रयत्न करणाऱ्या चीनवरच दडपण वाढल्याचे दिसत आहे.  

या पार्श्वभूमीवर, हिमाचल प्रदेशच्या धरमशाला येथे असलेल्या तिबेटींच्या निर्वासित सरकारचे प्रमुख   डॉ. सांगेय यांनी या समस्येसाठी चीन जबाबदार असल्याचे म्हटले आहे. लडाख हा निःसंशयपणे  भारताचा  भाग असून चीनने विनाकारण हा वाद निर्माण केला आहे, असे  डॉ. सांगेय यांनी ठासून सांगितले. ”भारत आणि तिबेटचे  संबंध ऐतिहासिक आहेत. सुमारे दोन  हजार वर्षाहून अधिक काळ भारत आणि तिबेट संबंध चालत आले असून दोन हजार वर्षांपासून भारत- तिबेट सीमा जशा होत्या तशा बनवा, हाच या वादावर एकमात्र उपाय आहे”, असे  डॉ. सांगेय यांनी सुचविले आहे. जोपर्यंत तिबेट प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारत आणि चीनचा सीमा वाद देखील सुटणार नाही, असा दावा डॉ. सांगेय यांनी केला. 

भारत -तिबेट सीमेवर शांती हवी, येथे बंदुकीचे काही काम नाही. जोपर्यंत तिबेटवर चीनने कब्जा घेतला नव्हता, तोपर्यंत येथे शांतता नांदत होती. सीमेवर लष्कराची आवश्यकताच  भासली नव्हती, याकडे  डॉ. सांगेय यांनी लक्ष वेधले. त्यामुळे तिबेटमधून सैनिक माघारी फिरले आणि येथे शांती प्रस्थपित झाली, तर इथला सीमावाद कायमचा संपुष्टात येईल आणि येथे कायम शांतता नांदेल,असा विश्वास  डॉ. सांगेय यांनी केला आहे.   

 ”हजारो वर्षाचा  इतिहास पहिला तर तिबेट स्वतंत्र देश होता, हे लक्षात येईल . १९१४ साली चीन व तिबेट आणि ब्रिटिश इंडियाचा करार झाला होता. तो चीनला  मान्य केला होता. पण कालांतराने चीनने हा करार पायदळी तुडवून तिबेटचा ताबा घेतला. अशा परिस्थितीत जर आम्ही आता तिबेटच्या स्वातंत्र्याची मागणी केली, तर आम्हाला कोण पाठिंबा देईल?, आमच्यासाठी कोण लष्कर पाठवेल? असे अनेक प्रश्न आहेत. म्हणूनच आम्ही चीनकडे स्वतंत्र न मागता पूर्ण स्वायत्तता मागत आहोत. पण चीन तिबेटला  स्वायत्तता देण्यासही तयार नाही, अशी खंत यावेळी डॉ. सांगेय यांनी व्यक्त केली.  

 दरम्यान, आपल्या संसदेत तिबेटच्या स्वातंत्र्याचे विधेयक मांडणाऱ्या अमेरिकेने या प्रश्नाचा पूर्ण अभ्यास करावा अशी मागणी तिबेटीयन युथ काँग्रेसने केली आहे.  चीन ज्याला तिबेटियन ऑटोनॉमस रिजन म्हणतो तो मूळ तिबेटच्या अर्धाच भाग आहे .  ऑटोनॉमस रिजन घोषित करताना चीनने तिबेटचा अर्धा भाग आपल्या  ताब्यात ठेवला होता. या ठिकाणी इथल्या जनतेवर चीनने अनन्वित अत्याचार केले आहेत, असे  तिबेटीयन युथ काँग्रेसचे अध्यक्ष गोनोपो धुंडूप यांनी म्हटले आहे. 

leave a reply