अगणित बळी घेणाऱ्या ‘चायना व्हायरस’शी संघर्ष सुरू

- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

न्यूयॉर्क – जगभरातील १८८ देशांमध्ये अगणित बळी घेणाऱ्या ‘चायना व्हायरस’शी संघर्ष सुरू आहे, या शब्दात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना साथीच्या मुद्यावरून चीनवर थेट प्रहार केला. संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या महासभेत बोलताना ट्रम्प यांनी, कोरोनाव्हायरसची साथ चीननेच फैलावल्याचा आरोप करून त्याची जबाबदारी या देशाला घेणे भाग पाडायला हवे, अशी आग्रही मागणीही केली. अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना चीनने, ट्रम्प संयुक्त राष्ट्रसंघटनेत राजकीय विषाणूचा प्रसार करीत असल्याचा आरोप केला.

'चायना व्हायरस'

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाच्या मुद्द्यावर चीनविरोधात आक्रमक मोहीम छेडली आहे. ट्रम्प यांनी सुरुवातीपासूनच या साथीचा उल्लेख ‘वुहान व्हायरस’ व ‘चायना व्हायरस’ असा करण्यास सुरुवात केली होती. प्राथमिक तपासात कोरोनाव्हायरस वुहानच्या प्रयोगशाळेतूनच बाहेर आल्याचे स्पष्ट होत आहे, अशा थेट शब्दात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर हल्ला चढविला होता. अमेरिका या साथीच्या उगमाचा तपास करीत असून जगभरात लाखोंचा बळी घेणारी ही साथ चीनने जाणीवपूर्वक पेरलेली असेल, तर त्याचे भयंकर परिणाम चीनला सहन करावे लागतील, असा इशाराही राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दिला होता. अमेरिकेसह जगभरात कोरोनाव्हायरस साथीची व्याप्ती वाढू लागल्यानंतर ट्रम्प यांच्या आरोपांची तीव्रता वाढत चालली आहे. संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या महासभेत केलेले वक्तव्यही त्याचाच भाग आहे.

'चायना व्हायरस'

‘उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करीत असताना जगभरात कोरोनासारखा प्लेग फैलावणाऱ्या चीनला त्याची जबाबदारी घेण्यासाठी भाग पाडायलाच हवे. व्हायरसच्या सुरुवातीच्या काळात चीनने अंतर्गत लॉकडाऊन करून देशातील नागरिकांना विमानाने परदेशात जाण्याची परवानगी दिली आणि साथ जगभरात पसरविली. चीन सरकार व त्यांच्या नियंत्रणात असलेल्या वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने मानवी संसर्ग नसल्याची खोटी माहिती दिली. नंतर लक्षणे नसलेल्या व्यक्तींकडून साथ पसरत नसल्याचा चुकीचा प्रचारही केला. या सगळ्या कारवायांसाठी संयुक्त राष्ट्रसंघटनेने चीनला जबाबदार धरायलाच हवे’, या शब्दात अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी चीनला लक्ष्य केले.

त्याचवेळी अमेरिकेत व्हायरसविरोधातील लस शेवटच्या टप्प्यात असून आपण व्हायरसला पराभूत करू आणि साथीची अखेर घडवून शांती व सहकार्याच्या नव्या युगात प्रवेश करू, असा दावाही राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केला. यावेळी ट्रम्प यांनी वाढते प्रदूषण व मानवाधिकारांच्या मुद्यावरूनही चीनवर टीकास्त्र सोडले. संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या महासभेत अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी ‘अमेरिका फर्स्ट’ धोरणाचे समर्थन करताना इतर देशांनीही त्याचे अनुकरण केल्यास हरकत नाही, असाही सल्ला दिला.

ट्रम्प यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना चीनने, अमेरिकी राष्ट्राध्यक्ष संयुक्त राष्ट्रांमध्येही ‘राजकीय विषाणू’ फैलावत असल्याचा आरोप केला. ‘साथीला राजकीय स्वरूप देण्याचा व एकाच देशाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न नाकारायला हवा. व्हायरसचा मुकाबला करताना सहकार्य व सौहार्द कायम राखले तर सर्व त्यातून बाहेर पडू शकतो’, असे सांगून चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी ट्रम्प यांचे आरोप फेटाळून लावले.

leave a reply